खारेपाटण पंचक्रोशीला पोलिस छावणीचे रूप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

गेल्या चार दिवसांत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने नागरिकांत समाधान आहे; मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांकडून कमालीची दक्षता बाळगली जात आहे. 

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - येथून लगतच असलेल्या एका गावातील नागरिकाचा स्वॅब अहवाल "कोरोना' पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्‍वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेसह लगतच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. त्या गावाला पोलिस छावणीचे रूप आले असून प्रत्येक घरातील नागरिकांची आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने नागरिकांत समाधान आहे; मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांकडून कमालीची दक्षता बाळगली जात आहे. 

मेंगलोर एक्‍सप्रेसमधून प्रवास करून आलेल्या या गावतील एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गावासह खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती खारेपाटण बाजारपेठेतही येऊन गेली असल्याने खारेपाटण शहरातील अनेकांचे धाबे दणाणले होते; मात्र सर्व संबधितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी आज खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. इंगवले, डॉ. प्रिया नडाम यांच्यासह अन्य उपस्थित होते. कणकवलीचे पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती रवींद्र जठार, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनीही स्थितीचा आढावा घेतला. 

"त्या' गावाला पोलिस छावणीचे स्वरूप 
खारेपाटणपासून काही अंतरावर असलेल्या या गावात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. या गावात दहा वाड्या असून 1401 एवढी लोकसंख्या आहे. मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या या गावाच्या सीमा पोलिसांकडून सील करण्यात आल्या आहेत. गावात 20 पोलिस कर्मचाऱ्यांसह 10 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले असून गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. याखेरीज गावचे सरपंच ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी हे देखील प्रशासनासह गावातील नागरिकांना मदत करत आहेत. 

घरीच राहण्याचे आवाहन 
जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र प्रत्येक लॉकडाऊन कालावधीत घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus issue in kharepatan