खबरदारी! सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अजूनही `या` अहवालांच्या प्रतिक्षेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

आरोग्य यंत्रणेद्वारे शनिवारी 3 हजार 33 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणासही कोरोना सदृष्य लक्षणे आढळली नव्हती. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी पाठविलेल्या नमुन्यातील सहा नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्नालयाच्या आयसोलेशन कक्षात सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 752 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील एकाही व्यक्तीला कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळलेली नाहीत. 

जिल्हा रुग्णालयामाफत 28 नमुने कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने हे शनिवारी निगेटीव्ह आले होते. या दिवशी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेद्वारे शनिवारी 3 हजार 33 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणासही कोरोना सदृष्य लक्षणे आढळली नव्हती. 

सर्व अत्यावश्‍यक सेवा पूर्णवेळ सुरू असून त्यांच्यावर वेळेचे कोणतेही बंधन नाही, अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूकही सुरू असून या वस्तूंच्या वाहतूकीसाठी पास देण्याचे काम संबंधीत तहसिलदार कार्यालयामध्ये सुरू आहे. 
संचारबंदीच्या काळात जिल्हावासियांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांची माहिती घेतली जात आहे. अशा संस्थांना संपर्काचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 

बेघर, मजुरांसाठी 
निवास-भोजनाची व्यवस्था 

जिल्ह्यातील बेघर तसेच परराज्यातील मजूर यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून संबंधीत तालुका स्तरावर ही व्यवस्था करण्यात येत आहे. गरीब लोकांना वैद्यकीस सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून ग्रामिण भागात संबंधीत ग्रामपंचायत व नागरी भागात नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवकांमाफत ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus issue in sindhudurg district