वैभववाडीतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्याचे धाबे दणाणले

एकनाथ पवार
Thursday, 1 October 2020

जेवण, नाश्‍ता, चहा, पाणी, स्टेशनरी, प्रोजेक्‍टर, बॅनर, प्रत्येक गोष्टीत त्या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढीव खर्च दाखवुन हजारो रूपयांचा घपला केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमातील खर्चात अधिकाऱ्यांनी केलेला घोळ उघड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यात प्रमुख ठपका असलेला अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. 

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना 15 व 16 नोव्हेंबर 2019 ला प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमावर तब्बल 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च करण्यात आले आहेत. जेवण, नाश्‍ता, चहा, पाणी, स्टेशनरी, प्रोजेक्‍टर, बॅनर, प्रत्येक गोष्टीत त्या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने वाढीव खर्च दाखवुन हजारो रूपयांचा घपला केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

न वापरलेल्या साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. चहा, जेवण आणि नाश्‍त्याचा मक्ता एकाच शेतकरी गटाला 20 हजार रूपयाला दिला होता; परंतु त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश काढुन त्याच्याकडुन 21 हजार रूपये त्या अधिकाऱ्यांने परत घेतले. हा सर्व प्रकार माहिती अधिकारात उजेडात आल्यानंतर त्या प्रकाराच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाल्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. संबंधितांनी आणखीही काही आर्थिक गडबड केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडकणार असल्याच्या भीतीने त्यांनी मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

पंचायत समितीत मुद्दा उपस्थित होणार 
वैभववाडी पंचायत समितीची मासीक सभा उद्या (ता.1) होणार आहे. या सभेच्या एक दिवस अगोदरच पंचायत समिती स्तरावर झालेल्या प्रशिक्षणाचा खर्च वादाचा भोवऱ्यात सापडल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे हा विषय आजच्या सभेत गाजण्याची शक्‍यता आहे. 

पंचायत समितीच्या सभेत हा विषय उपस्थित करणार आहोतच; परंतु त्याचबरोबर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. 
- मंगेश लोके, सदस्य, पंचायत समिती वैभववाडी 

पंचायत समिती स्तरावर 15 व 16 नोव्हेंबर 2019ला प्रशिक्षण झाले आहे. या प्रशिक्षणावर कोणकोणता खर्च झाला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे लेखा विभागाकडे मागीतली आहेत. या प्रशिक्षण खर्चात जर काही चुकीचे झाले असेल तर त्याची चौकशी केली जाईल. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption case in Vaibhavwadi