दोडामार्गात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा माजी नगराध्यक्षांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी काल (ता.7) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी काल (ता.7) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

विकासकामांची ई निविदा काढण्यात आली, त्यावेळी 2011 पासून ज्या ठेकेदाराची नोंदणी रद्द झाली होती, ज्यांचा जीएसटी नंबर अवैध होता त्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. आपण तक्रार केल्यावर त्या ठेकेदाराने परवाना नूतनीकरण करुन घेतला असला तरी तो अपात्र असताना त्याला ठेका देणे गैरच असल्याने त्याचीही चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""सत्तेत असताना आम्ही जी विकास कामे मंजूर केली तीच कामे आताच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहेत; मात्र ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. हनुमान कॉलनी येथे प्रवीण आरोंदेकर यांच्या घरापासून भणगे यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण, डांबरीकरण व गटार बांधणे इत्यादी कामासाठी 11 लाख 43 हजार निधी मंजूर आहेत. त्यानुसार चालू करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे.''

त्यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन वाळू खडीच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. वाळू आणि खडी एकत्रित केलेली कोणालाही समजू नये, म्हणून खडी पावडरच्या ढिगाऱ्यावर वाळूचे आवरण घालण्यात आले; मात्र फावड्याने वाळू बाजूला केली असता वाळू खाली खडी पावडर मिक्‍स केल्याचे उघड झाले. या कामासाठी वापरण्यात येणारी खडी निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे आपण हे काम रोखल्याचेही त्यांनी सांगितले.

कसई-गावठणवाडी येथील गटार बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी रस्त्यापलीकडे जाण्यासाठी गटारावर ओलांडे घालून देणे गरजेचे होते; परंतु ओलांडे घालून न दिल्याने नागरिकांना वाहतूक करण्यास अडथळा होत आहे. वरची धाटवाडी येथील गणपती सान्यापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी तीन लाख 45 हजार मंजूर आहेत. तेथील रस्त्यात मोठ-मोठी खडी टाकण्यात आलेली आहे. त्यावर बारीक खडी टाकून त्यांच्यावर रोलिंग करणे आवश्‍यक होते; परंतु तसे न करता कॉंक्रिटीकरण करण्यात येत असल्याचे श्री. नानचे यांनी पत्रकारांना दाखविले. यावेळी हरी कर्पे, विजय मोहिते, दादा बोर्डेकर, संदेश गवस आदी उपस्थित होते.

...म्हणून आमचा विरोध 
सध्या सुरू असलेली सर्व कामे आमच्या काळात आम्ही मंजूर करून घेतली आहेत; पण त्यांचे भूमिपूजन आणि प्रत्यक्ष काम शिवसेना-भाजपच्या कार्य काळात सुरू आहे. कामे मंजूर आम्ही करायची आणि त्यांची भूमिपूजने यांनी करायची असे असले तरी केली जाणारी कामे निकृष्ट दर्जाची असल्याने आपला त्याला विरोध आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दहा कामांसाठी 92 लाख
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत 10 कामांसाठी 91 लाख 43 हजार 298 रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. त्यातील तीन कामे करण्यात येत आहेत; पण त्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे, असा आरोपही श्री. नानचे यांनी केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption in development works in Dodamarg