esakal | नियम मोडणाऱ्या ;त्या' दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार ; संजू परब यांची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

Couples who break the rules will be charged say Sanju Parab

शहरात नियम न पाळणार्‍या व्यापारी तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.

नियम मोडणाऱ्या ;त्या' दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार ; संजू परब यांची माहिती 

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी ; शहरातील चितार आळी परिसरातील कोरोना पाॅझिटिव्ह  दाम्पत्यामुळे आज पुर्ण शहर त्रास सहन करत आहे. त्यांनी मोडलेले नियम लक्षात घेता त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तर शहरात नियम न पाळणार्‍या व्यापारी तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.


नगराध्यक्ष परब यांनी आज पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, नगरसेवक आनंद नेवगी, उदय नाईक, भाजप शहर उपाध्यक्ष अजय गोंदावले, बंटि पुरोहित आदी उपस्थित होते. याबेळी नगराध्यक्ष श्री परब म्हणाले, शहरांमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव लक्षात घेता मुख्याधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये मंगळवारचा होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तर काही आवश्यक निर्णयही घेण्यात आले. यामध्ये शहरात बेकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे नियम मोडणाऱ्या सर्वच व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाढती रुग्ण संख्या विचारात घेता व्यापारी संघाच्या सहकार्याने जनता कर्फु लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. तर ई पासच्या माध्यमातून मुंबई-पुणे फिरून येणाऱ्यांची माहिती पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांनी पालिकेला द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.


नगराध्यक्ष श्री परब पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरामध्ये आजपर्यंत आलेल्या मुंबई पुणे व इतर भागातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करताना स्वतःची व इतरांची काळजी घेतली होती. त्यामुळे शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. मात्र चितार आळीतील पाॅझिटिव्ह आढळून आलेले दाम्पत्य ठाणे मुंबई फिरून आल्यावर त्याबाबतची माहिती पालिकेला न देता व स्वतःला क्वारंटाईन न करून न घेता शहरांमध्ये सगळीकडे फिरले आहेत. या एका दाम्पत्यमुळे संपूर्ण शहराला त्रास सहून करून घ्यावा लागत आहे, मुळात जिल्हाधिकारी यांनी ई पास दिल्यानंतर त्या बाबतची माहिती पालिकेला देणे गरजेचे होते. परंतु ती माहिती दिली नसल्याने आणि त्यांची तक्रारही कोणी  न केल्याने ते कधी आले व कधी गेले हे पालिका प्रशासनाला समजू शकले नाही. त्यामुळे या दाम्पत्यावर नियम मोडल्याप्रकरणी कोणत्या कायद्याखाली गुन्हा दाखल करावा याबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या दाम्पत्याने केलेली चूक लक्षात घेता प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, कोणीही नियम मोडू नये. व्यापाऱ्यांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

हे पण वाचा - राज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट  कोणता वाचा.... 

गर्दी करू नका

शहरातील मोती तलावांमध्ये नारळी पौर्णिमेला दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा नागरिकांनी गर्दी टाळावी, सोशल डिस्टन पाळून तलावाला नारळ अर्पण करावा. याकरता पोलीस ठाण्याकडून योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा असे आवाहनही नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image