माध्यमिक शिक्षकांची सिंधुदुर्गात कोविड चिकित्सा

विनोद दळवी 
Thursday, 19 November 2020

नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून शासनाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

सिंधुदुर्गनगरी -  नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 210 माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 2323 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. 

नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून शासनाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा 210 माध्यमिक विद्यालयांतील 2242 शिक्षक आणि 811 शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 2323 जणांची कोरोना चाचणी करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तपासणी केंद्रांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी होऊ लागली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक विद्यालये सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकामध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

शाळा सुरू करण्यापूर्वीच्या सूचना 
- शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधा आवश्‍यक 
- सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी बंधनकारक 
- चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीला देणे आवश्‍यक 
- कोविडसंदर्भातील सूचनांचे पालन करावे 
- सर्व भागधारकांचे विविध कार्य गट करावेत 
- बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसारच 
- विद्यार्थी उपस्थितीपूर्वी पालकांची लेखी संमती आवश्‍यक 

शाळा सुरू झाल्यानंतरच्या सूचना 
- शाळा वर्गखोल्यांची स्वच्छता आवश्‍यक 
- हॅण्डवॉश, स्वच्छ पाण्याची व्यवस्था गरजेची 
- स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे 
- सुरक्षित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याबाबत दक्षता घ्यावी 
- स्वच्छता कामांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये 
- विद्यार्थी, शिक्षकांसाठी मास्कचा वापर बंधनकारक 
- प्रवासी वाहनांचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे 
- किमान 6 फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे 
- चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत याची खबरदारी 
- शालेय साहित्याची अदलाबदल करू नये 
- एक दिवस आड करून 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे 
- वर्गाचा कालावधी चार तासांपेक्षा अधिक नसावा 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid therapy of secondary teachers in Sindhudurg