क्रेडिट कार्डच्या खात्यातून पळवले 67 हजार ; प्राध्यापकांची फसवणूक  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

यासंदर्भात आज ता. 23 रोजी या प्राध्यापकांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार केली

गुहागर : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन भामट्याने प्राध्यापकाला ऑनलाइन 67 हजाराला गंडा घातला. 
एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 अशी एकूण 67 हजार 250 रक्कम खात्यातून काढण्यात आली. बॅंकेकडे तक्रार केल्यावर रक्कम परत येईल, या आशेवर हे प्राध्यापक होते. मात्र, आजपर्यंत पैसे न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात आज ता. 23 रोजी या प्राध्यापकांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

तालुक्‍यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर येथे प्राध्यापक असलेले गजानन पुरुषोत्तम खापरे (मुळगाव कौलखेड, ता. जि. अकोला) यांच्या क्रेडिट कार्डवरुन भामट्याने 67 हजार 250 रुपये काढून घेतले. सदर क्रेडिट कार्ड गजानन खापरे यांनी मुंबईतील विमानतळावरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विक्री स्टॉलवरुन 21 डिसेंबरला खरेदी केले होते. त्यासाठी स्टॉलवर गजानन खापरे यांनी आधारकार्डची झेरॉक्‍स दिली होती. हे क्रेडिट कार्ड गजानन खापरेंना पोस्टाने 9 जानेवारी 2021 ला मिळाले. क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरात खापरेंना एक फोन आला. आपण स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगत सदर व्यक्तीने खापरेंना कार्ड व्हेरिफिकेशनसाठी कार्डवरील शेवटचे दोन क्रमांक व जन्मदिनांक विचारला. त्यानंतर अवघ्या 56 मिनिटांमध्ये खापरेंच्या क्रेडिट कार्डवरुन 42 हजार आणि 25 हजार 250 रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाल्याच संदेश मोबाईलवर आला. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे प्रा. गजानन खापरे यांच्या लक्षात आले. तातडीने खापरे यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया क्रेडीट कार्ड विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: credit card crime gruhagar police station