esakal | धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा दोन लाखाला सौदा
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा दोन लाखाला सौदा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा दोन लाखाला सौदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण रेल्वेतून पळविण्यात येणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचा २ लाखाला सौदा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे; मात्र ज्या व्यक्तीसोबत हा सौदा झाला, त्याच्यापासून आपली सुटका व्हावी, म्हणून प्रियकराबरोबर ती राजस्थानला पळून जात होती. मुलगी ताब्यात न मिळाल्याने सौदा करणाऱ्या त्या व्यक्तीने हा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, मुलीचा सौदा नेमका कोणत्या कारणासाठी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस झाला. केरळ पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि रत्नागिरीत त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते; मात्र या कारवाईदरम्यान विकी नामक तिचा कथित प्रियकर व त्याचे साथीदार संधी साधून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पळून गेले होते. ज्या ओखा एक्‍स्प्रेसमधून ही अल्पवयीन मुलगी विकी नामक तरुणासोबत राजस्थानला निघाली होती. ओखा एक्‍स्प्रेसची रत्नागिरी रेल्वे स्थानकात तीनवेळा तपासणी झाली. तब्बल २५ मिनिटे ही गाडी थांबविण्यात आली. ग्रामीण पोलिस निरीक्षक विनित चौधरी आणि रेल्वे पोलिस यांनी त्या मुलीचा फोटो डी-१ या डब्यामधील प्रवाशांना दाखविला आणि हा प्रकार उघड झाला.

चौकशीवेळी धक्कादायक माहिती

दरम्यान, मुलीला ताब्यात घेतले; मात्र चौकशीवेळी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या मुलीचा केरळ येथे दोन लाखाला सौदा झाला होता. नेमका हा सौदा कोणत्या कारणासाठी झाला? मुलगीची विक्री कोणी केली आणि खरेदीदार कोण होता? हे स्पष्ट झालेले नाही; मात्र ज्या व्यक्तीसोबत सौदा झाला, त्या व्यक्तीच्या ताब्यात मुलगी न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

शिक्षिकेसोबत वाद...टॉयलेटची काच फोडली

ओखा एक्‍सप्रेसमधून मडगाव येथील एक शिक्षिका प्रवास करीत होती. ही महिला डी-१ डब्यात होती. तिला पोलिसांनी फोटो दाखविला असता, तिने त्या मुलीला ओळखले. या मुलीबरोबर प्रवासात वाद झाल्याचेदेखील शिक्षिका असलेल्या त्या महिलेने पोलिसांना सांगितले. डब्यातील एक टॉयलेट बंद असल्याची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिली. या वेळी पोलिसांनी टॉयलेट उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र आतून लॉक असल्याने बंद असलेले टॉयलेट उघडता आले नाही. बंद टॉयलेटमध्ये कोणीतरी आहे, असा संशय आल्यानंतर बाहेरून आवाज देऊन टॉयलेट उघडण्याची विनंती केली; अखेरीस पोलिसांनी बाहेरून टॉयलेटची काच फोडली आणि साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला.

एक नजर..

  • विकी नामक प्रियकर व त्याचे साथीदार पळाले

  • मुलगी विकीसोबत राजस्थानला निघाली होती

  • ओखा एक्‍स्प्रेसची रत्नागिरीत तीनवेळा तपासणी

  • तब्बल २५ मिनिटे ही गाडी थांबविण्यात आली

  • मुलीचा फोटो डी-१ या डब्यामधील प्रवाशांना दाखविला

  • डब्यातील एक टॉयलेट बंद असल्याची माहिती मिळाली

  • पोलिसांनी बाहेरून टॉयलेटची काच फोडून केली सुटका