esakal | दुसऱ्या लाटेचा धसका: तासन्‌तास उभे राहूनही मिळेना लस

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या लाटेचा धसका: तासन्‌तास उभे राहूनही मिळेना लस
दुसऱ्या लाटेचा धसका: तासन्‌तास उभे राहूनही मिळेना लस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, लसीकरणाचे अपुरे डोस असल्याने तासन्‌तास रांगेत उभे राहिल्यावरही लस न मिळाल्याने अनेकांना माघारी परतावे लागते. डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसू लागला आहे. दरम्यान, ऑनलाईन नोंदणीशिवाय नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर येऊच नये, असे आवाहन प्रशासनाने केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धसका घेतल्याने नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागत आहेत. सध्या 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येते. त्यासाठी सोमवारी 10 हजार 830 डोस आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध झाले. लस उपलब्धेबाबत कमतरता असल्याने नागरिक धास्तावले असून, ते लसीकरणासाठी रोज केंद्रावर गर्दी करू लागले आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य केले आहे. अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने उघडायची असतील तरीही लसीकरण किंवा कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली. त्यामुळेही लसीकरणासाठी संख्या वाढली आहे.

जिल्हा रुग्णालयात हंगामा

काल (ता. 20) जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी सहापासूनच लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकही रांगेत बराच वेळ उभे होते. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल, कोव्हॅक्‍सिन उपलब्ध नाही, असा फलक लावण्यात आला. यामुळे रांगेत उभे असणाऱ्या लोकांनी हंगामा केला.

गर्दी वाढू लागल्याने ऑनलाईन नोंदणीशिवाय लसीकरणासाठी केंद्रावर येऊच नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला.

- डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी

Edited By- Archana Banage