जुन्या नकाशानुसार सीआरझेड आराखडा; बाबा मोंडकर यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

वास्तविक पाहता चेन्नई येथील संस्थेने नकाशा बनविताना 2020 मधील माहिती घेऊन नकाशा बनविणे गरजेचे होते. त्यामध्ये विजयदुर्ग ते रेडीपर्यत वसलेल्या 25,000 पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंबांना आरक्षित करून कोळीवाडे नोंद करणे गरजेचे होते.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - सीआरझेड आराखड्यावर सुनावणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या आराखड्यावर सुनावणी होत आहे, त्या नकाशा बनविणाऱ्या चेन्नई येथील संस्थेच्या प्रतिनिधीने हा नकाशा बनवत असताना 2011 पर्यतचा डाटाबेस व या कालावधीमधील सॅटेलाईट नकाशा विचारात घेतले आहेत. प्रत्यक्ष जागेवर येऊन मॅपींग झालेले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केला आहे. 

या गोष्टीची कल्पना प्रशासनाला व ठाकरे सरकारला असून अशाप्रकारे 9 वर्षांपूर्वीच्या माहिती आधारे बनविलेला नकाशा कायम करून जिल्ह्यातील खाडी, नदी व समुद्र किनारी वसलेल्या लाखो लोकांना विस्थापित व देशोधडीला लावायचे काम प्रशासनाला हाताशी धरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत असल्याची टिकाही श्री. मोंडकर यांनी केली. 

वास्तविक पाहता चेन्नई येथील संस्थेने नकाशा बनविताना 2020 मधील माहिती घेऊन नकाशा बनविणे गरजेचे होते. त्यामध्ये विजयदुर्ग ते रेडीपर्यत वसलेल्या 25,000 पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंबांना आरक्षित करून कोळीवाडे नोंद करणे गरजेचे होते. त्यांच्या दैनंदिन वापराच्या कावन, मासेमारी जाळी, होडी, रापण ठेवायची व ओढायची जागा, मासे खारविणे, सुकविणे यासाठी आवश्‍यक जागा तसेच नदी व खाडीकिनारी अपूर्ण व मोडकळीस आलेल्या खारबंधाऱ्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी घुसून खासगी मालकीच्या हजारो एकर जागेत मॅंग्रोव्ह उत्पन्न झाल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर विस्थापित होण्याची भीती असलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी या आराखड्यात तरतूद होणे गरजेचे होते.

एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने काही बदल अपेक्षित होते. अशाप्रकारचा नकाशा लादूनही पर्यावरण खाते ठाकरे कुटुंबाकडे असल्यामुळे त्याचे जिल्ह्यात असलेले खासदार, आमदार हतबल झाले आहेत हे एकदा जनतेसमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे. 

जनतेत जाऊन कार्यशाळा घ्या 
प्रशासनाला दोनवेळा सुनावणी रद्द करावी लागली. हे जनतेच्या उद्रेकामुळे होवूनही स्थगित झालेली सुनावणी परत घेणे चुकीचे होते. यासंबंधी टीटीडीएस संघटनेच्या व भाजपच्यावतीने मालवण पंचायत समितीमध्ये अशाप्रकारची सुनावणी घेणे चुकीचे आहे. या माध्यमातून प्रशासन लोकप्रतिनिधी व जनता यामध्ये दरी निर्माण करीत आहे. आजची चुकीची जनसुनावणी न करता या सुनावणीची नोंद ज्या अडचणी येत आहेत. त्या मार्गस्थ होण्यासाठी चर्चासत्र अशी नोंद करा, नऊ वर्षापूर्वीचा नकाशा बदलून सद्य:स्थितीतला नकाशा करा. जनतेमध्ये जाऊन या विषयाच्या माहितीची कार्यशाळा घ्या, अशी मागणी केल्याचे श्री. मोंडकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRZ Layout As Per Old Map Baba Mondkar Comment