कोकणची संस्कृती ; आया ओ ओवेसेते...गौराईबाई

सचिन माळी
Thursday, 27 August 2020

जागरणात रंगले पारंपरिक खेळ; गौराईंचे भक्तिमय स्वागत

मंडणगड (रत्नागिरी) : माझ्या दाराशी तिळाची काडी....तिला धरली डोउली पाडीकाळी ग गरसोली...तिच्या पायात जोडवी, आया ओ ओवेसेते...गौराईबाई. कोकणात गौराईला सुपे ओवेसणे ही प्रथा आहे. आज गौरी पूजनाला महिला, मुलींनी सुपाने ओवाळून गौराईसोबत गणपतीची आराधना केली. पारंपरिक बोली भाषेतील गाणी गाऊन हा गौरी पूजनातील महत्वाचा धार्मिक सोहळा पार पडला. रात्रभर जागरणात सासुरवाशींनी व माहेरवशीणींचे फुगड्या, गाणी असे विविध पारंपरिक खेळ रंगले.

हेही वाचा- नाणार रिफायनरीला पूर्ण विराम ? वाचा सविस्तर -

गणपती आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन करण्यात आले. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी गावाच्या वेशिवरून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणण्यात आले. यावेळी गौरी आली, सोन्याच्या पावली...अशी पारंपरिक गाणी गाण्यात आली. गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत करण्यात आले. नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात आले. गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात आली. सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून गौरीचे पूजन केले.

हेही वाचा- निचपणाचा कळस : बापाने फासला नात्याला काळीमा , मुलीला केले कुमारी माता

देवाचे नमाण घेतल्यानंतर भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली पाच वेळा ओवाळणी केली. याला ओवेसने म्हणतात. मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणारा हा उत्सव मराठी संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे.ज्यावर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते, त्यावर्षी नववधूचेही ओवसे करण्याची परंपरा आहे. यावेळी हा योग नसल्याने प्रतिवर्षी प्रमाणे महिला, मुलींनी आपले नियमित ओवसे केले. कोरोनामुळे यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र उत्साह कायम दिसून आला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: culture of kokan women traditional Songs in dialect religious ceremony held