esakal | भगवा फडकवायचा यांचीच होती उत्सुकता; कारसेवकाने जागवल्या आठवणी
sakal

बोलून बातमी शोधा

Curious About Saffron In Ayodhya Karsevak Comment In Interview

5 ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने आजही उत्सुकता आहे. अयोध्यानगरी सजली आहे, त्याची छायाचित्रे पाहून आज मन तिथे पोहोचले. मंदिर बांधून झाले की लगेच सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहे.

भगवा फडकवायचा यांचीच होती उत्सुकता; कारसेवकाने जागवल्या आठवणी

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - कारसेवेला जायचे याबद्दल मनात हुरहूर, उत्सुकता होती. उत्तर प्रदेशमध्ये नाक्‍यानाक्‍यावर पोलिस बंदुका घेऊन उपस्थित होते, त्यामुळे मनावर दडपणही होते. भगवा झेंडा फडकवायचा होता, त्याची उत्सुकता साऱ्या कारसेवकांच्या मनात होती, अशा काही आठवणी रा. स्व. संघाचे माजी शहर कार्यवाह प्रकाश सोहोनी यांनी जागवल्या. 

5 ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने आजही उत्सुकता आहे. अयोध्यानगरी सजली आहे, त्याची छायाचित्रे पाहून आज मन तिथे पोहोचले. मंदिर बांधून झाले की लगेच सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहे. यापूर्वी सरदार पटेलांचा सर्वांत उंच पुतळा पाहिला. कन्याकुमारी पाहिली. आता अयोध्येत राम मंदिर दर्शनाची वाट पाहतोय, अशी भावना श्री. सोहोनी यांनी व्यक्त केली. 

श्री. सोहोनी म्हणाले, कारसेवेला जायचे ठरले तेव्हा उत्साहात होतो. रत्नागिरीतून अनेक जण त्या वेळी गेले होते. रेल्वेने अलाहाबादला पोहोचलो व तिथून अयोध्येला गेलो. प्रचंड थंडी होती. त्या वेळी महाराष्ट्रातले कार्यकर्त्यांची स्मशानाजवळच्या भागात राहायची व्यवस्था होती. काही कारसेवक आपल्या मुलांना देखील घेऊन आले होते. एका ध्येयाची 15 लाख माणसं एकत्र आली होती. 

विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, धर्मसंसदेने पुढाकार घेतला होता. कारसेवा, प्रारंभ, त्यातील विविध टप्पे या विषयी अनेक ठिकाणच्या कारसेवकांशी चर्चा घडून आली. त्याविषयी रात्रभर गप्पा मारल्या. कारसेवेला यश मिळण्यापूर्वी भारतभर श्रीरामाच्या मूर्तींचे पूजन, ज्योत पूजन असे कार्यक्रम सुरू होते.

त्या वेळी अयोध्येत प्रत्येक रस्त्यांवर लाऊडस्पीकर लावले होते. त्यामुळे मंडपातील सर्व सूचना समजत होत्या. सभामंडपातील भाषणांनाही प्रचंड गर्दी व्हायची. कोणतेही पक्षीय राजकारण नव्हते, तेथे फक्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते आले होते. कारसेवा होणार, अशी घोषणा झाली आणि हजारो कारसेवक धावतपळत पुढे सरकले. विवादित वास्तू पडल्यानंतर 4 वाजेपर्यंत सर्व स्थिती पूर्वपदावर येत होती. नंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी कारसेवकांची गर्दी झाली. 

बदनामीचा प्रयत्न हाणून पाडला 

कारसेवेला बदनाम करण्याचा प्रयत्नही काही परदेशी नागरिकांकडून घडत होता. तेथे आलेल्या साधूंची चेष्टामस्करी, खिल्ली उडवण्याचा प्रयत्नही झाला. म्हणजे बिस्कीटाचे पुडे टाकून काहीजण ते उचलायला गेले की त्यांचे फोटो काढले जात व यांना जेवायला मिळत नाही, अशा बातम्या उठवल्या जात होत्या. पण ही वास्तव स्थिती नव्हती. अयोध्येतील सर्व जातीधर्माचे लोक दुकाने चालवत व कारसेवकांना मोफत जेवण, चहा, नाश्‍ता देत होते. 
(क्रमशः) 
 

संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे