वेंगुर्ले किनाऱ्याला वायुवादळाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

वेंगुर्ले - येथील समुद्र किनाऱ्यालाही वायुवादळाचा तडाखा बसला. नवाबाग किनाऱ्यावरील झाडे वादळाच्या तडाख्याने पडली, तर खाडी भागात ठिकठिकाणी पाणी भरल्याची माहिती येथील मच्छीमारांनी दिली आहे.

वेंगुर्ले - येथील समुद्र किनाऱ्यालाही वायुवादळाचा तडाखा बसला. नवाबाग किनाऱ्यावरील झाडे वादळाच्या तडाख्याने पडली, तर खाडी भागात ठिकठिकाणी पाणी भरल्याची माहिती येथील मच्छीमारांनी दिली आहे.

अजस्त्र लाटांमुळे वेंगुर्ले बदर खचले असून बंदराला तडे गेले आहेत. दुसरीकडे बंदर आणि मांडवीकडे जाणारा रस्ता खचल्याने बंदर ,मांडवीकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना बंदर आणि मांडवीवर जाता येणार नाही अजून पंधरा दिवस समुद्रात तुफान रहाण्याची शक्यता मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली आहे

मांडवी खाडीत पाणी वाढल्याने तेथे नांगरून ठेवलेल्या होड्या मच्छीमारांनी बाहेर काढल्या. खाडीत पाणी वाढत असल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सायंकाळपासून शहरात पावसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळे घरे, दुकाने आदींवर कौले, तसेच प्लास्टिक घालताना नागरिक दिसत होते; मात्र काही वेळ पडलेल्या या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारठा निर्माण झाला. नवाबाग, दाभोली, वायंगणी या ठिकाणी सर्वांत जास्त पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दाभोली-मोबारवाडी येथे मच्छीमारांच्या घरापर्यंत पाणी आले असून, मच्छीमारांनी किनाऱ्यावर ठेवलेल्या होड्या अजून सुरक्षितस्थळी हलवल्या आहेत.

 

सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असल्याने किनाऱ्यासह सर्व यंत्रणांना सावधानता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेषतः किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclon vayu damage Vegurle port