सभापती हजवानी यांचा राजीनामा मागे; राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेशी सोयरीक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

नाराजीनंतर आपण वेगळा विचार करू शकतो, असे संकेत त्यांनी दिले. पाठोपाठ कदम यांची भेट घेतली.

दाभोळ : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात दापोली पंचायत समितीत संघर्षाची चिन्हे आहेत. सभापती रउफ हजवानी यांनी राजीनामा दिला खरा; परंतु आता तो मागे घेऊन राष्ट्रवादीची अडचण केली. ते शिवसेनेच्या दारी गेले. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली आहे. 

राष्ट्रवादी त्यांना सभापतिपदावरून हटवू शकत नाही आणि शिवसेना त्यांचे समर्थन करणार, असा मामला झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीला हजवानी यांनी कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. नाराज सभापती हजवानी यांनी पत्नी व कार्यकर्ते यांच्यासह रामदास कदम यांची मुंबई येथील पालखी निवासस्थानी भेट घेतली. 
 
त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे तालुक्‍यातील विकास कामांसंदर्भात निवेदनही दिले. त्यांची शिवसेनेशी जवळीक हा राष्ट्रवादीला संदेश समजला जात आहे. हजवानी यांना केवळ आठ महिन्यांचाच कालावधी राष्ट्रवादीने दिला होता. त्यातील चार महिने कोरोनातच गेले. त्यामुळे विकासकामे करण्यास अवधी मिळाला नाही व म्हणून कार्यकाल वाढवून देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रवादीकडे केली. ती पक्षाने मान्य केली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला होता; मात्र तो परत घेतल्याने तेच सभापती आहेत. नाराजीनंतर आपण वेगळा विचार करू शकतो, असे संकेत त्यांनी दिले. पाठोपाठ कदम यांची भेट घेतली.

पंचायत समितीत राष्ट्रवादीचे ७ तर शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हजवानी यांच्यावर अविश्‍वासाचा ठराव आणता येत नाही व त्यांनी सेनेशी जवळीक केल्यास अविश्‍वास ठरावाला सेना मदत करणार नाही. त्यामुळे नाक मुठीत धरून राष्ट्रवादीला हजवानींनाच सभापतिपदी ठेवावे लागेल.

हे पण वाचापरीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा! ; विद्यार्थ्यांची मागणी

 योग्य वेळी राजीनामा

अद्याप दापोली पंचायत समिती सभापतिपदाचा तसेच राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही. योग्य वेळ आल्यावर राजीनामा देऊ, अशी माहिती सभापती रउफ हजवानी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘‘माझ्या पत्नीने स्वतःहून शिवसेनेत प्रवेश केला. तो तिचा वैयक्तिक निर्णय आहे. यामुळे समाजमाध्यमांवर आपल्यावर तसेच आपल्या पत्नीविरोधात विविध पोस्ट टाकल्या जात असून, हे आरोप वेळीच थांबले नाहीत तर आपण समाजमाध्यमांवर पोस्ट टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत.’’

हे पण वाचाकोविड सेंटरमध्ये गाजताहेत राजकीय फड ; कोविडला ‘भूल’ देण्याची ‘मात्रा’  

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dabhol municipal council Speaker Hajwanes resignation withdrawal