Kokan : राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Government Assistance Farmers Deposit fund

Kokan : राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत

दाभोळ : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकऱ्यांना निधी दिला. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी दिली. शिंदे फडणवीस सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करत आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

साठे म्हणाले की, ‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांपूर्वी केली होती व दोन अर्थसंकल्पांतही त्याचा उल्लेख केला होता. परंतु, महाविकास आघाडी सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. विरोधी पक्ष भाजपाने या विषयांवर आंदोलनही केले होते. अखेर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारने याची अंमलबजावणी सुरू केली व ६ लाख ९० हजार शेतकर्‍यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये सरकारने जमा केले.

शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी यावेळेस पहिल्यांदाच एका क्लिकवर निधी जमा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा झाल्याने शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बाबतीत जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे युध्द पातळीवर करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, असाही आदेश सरकारने दिला आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ शक्य

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देण्याचा निर्णय झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होणार आहे तसेच नाशवंत शेतीमालाचे काढणी पश्‍चात नुकसान कमी होणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले दर मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दलही साठे यानी सरकारचे अभिनंदन केले.