esakal | "धरण उशाशी, तरी कोरड घशाशी' पणदेरी प्रकल्पाची स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Dam Near But No Use Panderi Dam Project Status

मंडणगड तालुक्‍यातील पणदेरी धरणात प्रचंड पाणीसाठा असूनही केवळ कालवे अपूर्णावस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना गेली पंचवीस वर्षे शेतीसाठी पाण्याची प्रतीक्षाच आहे.

"धरण उशाशी, तरी कोरड घशाशी' पणदेरी प्रकल्पाची स्थिती

sakal_logo
By
सचिन माळी

"धरण उशाशी, तरी कोरड घशाशी' असा यमक साधणारा शब्दप्रयोग कोकणातील यच्चयावत धरणांबाबत करावा लागेल. कोणताही धरणाचा मोठा प्रकल्प पूर्णांवशाने यशस्वी झाला नाही. ओलिताखाली येणारे क्षेत्र हा महत्त्वाचा निकष मानला तर कोणत्याही छोट्या वा मोठ्या धरणाची या दृष्टीने पूर्तता झाली नाही. शिपोशीचे धरण फुटले, त्यानंतर काही काळाने तिवरे धरणाची दुर्घटना झाली. यामुळे त्यांच्या उपयोगापेक्षा धरणयातना असा शब्दप्रयोग रूढ झाला, हे कोकणवासीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. 40 वर्षे सुरू असलेल्या पणदेरी धरण प्रकल्पाबाबत अशीच स्थिती आहे. धरण पूर्ण भरलेले असले तरी ओलिताखालील क्षेत्र आजही शून्य आहे. याबाबत ना संबंधित खाते माहिती देते ना अधिकारी लक्ष देतात. 

मंडणगड तालुक्‍यातील पणदेरी धरणात प्रचंड पाणीसाठा असूनही केवळ कालवे अपूर्णावस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना गेली पंचवीस वर्षे शेतीसाठी पाण्याची प्रतीक्षाच आहे. दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने धरण बांधणीचा मूळ उद्देश सफल झालेला नाही. शासन, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्‍यातील जलसिंचन फक्त नावालाच असल्याची टीका शेतकरी करत आहे. 

लघु पाटबंधारेचा पणदेरी धरण प्रकल्प 7 कोटी 55 लाख रुपये खर्च करून 1995 साली पूर्ण करण्यात आला. स्थानिक नाला नदीवर असणाऱ्या या धरणाची लांबी 265 मीटर तर धरण माथा रुंदी 3 मीटर आहे. या धरणात 4.01 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असून उपयुक्त पाणीसाठा 3.24 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची महत्तम उंची 27.97 मी. आहे. धरण बांधणीत पणदेरी व घोसाळे गावातील क्षेत्र बुडीत गेले आहे. पणदेरी परिसरातील 255 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. त्यामुळे घोसाळे, पणदेरी, बहिरीवली, कोंडगाव, दंडनगरी गावांना त्याचा फायदा होणार होता; मात्र कागदावर असणाऱ्या या सर्व गोष्टी प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याची शेतकऱ्यांना आस लागून राहिली आहे.

धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालव्यांचे नियोजन करण्यात आले. उजवा कालवा 2.84 किमी तर डावा 4 किमीचा आहे; मात्र दोन्ही कालवे अपूर्ण आहेत. तालुक्‍यात मुसळधार पाऊस आणि ओढ्याला प्रचंड पाणी येत असल्याने हे धरण अल्प कालावधीतच तुडुंब भरून ओव्हरफ्लो होते. पुंडी प्रकारच्या सांडव्याची लांबी 52 मी. असून त्यावरील पुराची उंची 4 मी. असते. यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग होतो. त्यामुळे पुढे वाहणाऱ्या ओढ्याला पूर येऊन पाणी सर्वत्र पसरते. कालवे पूर्ण करून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेल्यास परिसरातील शेतकरी दुबार शेतीकडे वळेल. त्यामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देश सफल होऊन शेतकरी सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार असल्याने त्वरित यावर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. 

दिशाभूल करणारा फलक 
पणदेरी धरण प्रकल्प 1995 साली पूर्ण झाल्याचा फलक लघु पाटबंधारेने लावला आहे; मात्र काम अपूर्ण असून अर्धवट कालव्यांमुळे एकदाही पाणी सोडण्यात आले नाही. या प्रकल्पावर आजतागायत सुमारे पंधरा कोटींच्यापेक्षा अधिक खर्च करण्यात आला. त्याचा उपयोग शून्य असून परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे कोंडगावचे ग्रामस्थ व माजी उपसभापती रामदास रेवाळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. रेवाळे म्हणाले, 1972 साली याचे काम सुरू करण्यात आले. 40 वर्षे व्हायला आली तरीही एक रुपयाचा फायदा झाला नाही. संबंधित विभाग याबाबत काहीच कळू देत नाही.

2012 साली माहितीच्या अधिकारात या प्रकल्पावर पंधरा कोटींचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी धरण परिसरात एक शेड बांधली आहे. त्यावर सुमारे सात ते आठ लाख खर्च झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रत्येक वर्षी या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर अफाट खर्च होत असल्याचे दाखवले जाते मात्र त्याचा उपयोग काय? या परिसरात कोंडगाव, बहिरीवली, पणदेरी ग्रामपंचायती आहेत. धरणासंदर्भात कुठलीही माहिती ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना दिली जात नाही. अधिकारी कुठल्या सभेला उपस्थित राहत नाहीत. योग्य नियोजन केले आणि चांगल्या पद्धतीने कालवे उभारले तर पाणी अगदी उंबरशेत, पडवे गावांपर्यंत जाईल. पण पायथ्याशी असणाऱ्या पणदेरी गावांपर्यंतही अजून कालवा गेला नाही. काढलेले कालवे पुन्हा बुजले असून ज्या शेतकऱ्यांनी जागा दिली त्यांनी त्यावर पुन्हा शेती करण्यास सुरवात केली असून अनेक ठिकाणी फळबाग लागवड केली आहे. तसेच सांडव्याला गळती सुरू झाली आहे. 

आमदारांच्या पाहणीनंतर काम सुरु 
जानेवारी 2020 मध्ये आमदार योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पाहणी केली. यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; मात्र लॉकडाउनमुळे तेही थांबल्याचे चित्र आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना झाल्यास बारमाही शेती करून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करू शकतो. परंतु संबंधित प्रशासनाची उदासीनता यामुळे असे चित्र कोसो दूर असल्याचे रेवाळे यांनी सांगितले. 

धरणांचे अपूर्णावस्थेतील कालवे परिपूर्ण जलसिंचन होण्याच्या दृष्टीने भूमिगत करण्याचे नियोजन आहे. कृषी विकासात्मक दृष्टिकोनातून संबंधित विभागाकडे यावर कृतिशील पावले उचलली आहेत. भौगोलिकदृष्ट्या साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंपदा वाढवण्यावर भर देण्यात येईल. 
- योगेश कदम, आमदार 

धरण परिसरातच शेती ओसाड 
जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, व्यापार किंवा अन्य बाबींसाठी त्याचा उपयोग दिसून येत नाही. धरण परिसरातच शेती ओसाड पडली आहे. सर्वच स्तरावर दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. एकाच वार्षिक उत्पन्नावर अवलंबून राहावे लागत असल्याने परिणामी रोजगारानिमित्त स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

दृष्टिक्षेपात धरण 
7 कोटी 55 लाख रुपये खर्च 
धरणाची लांबी 265 मीटर 
धरण माथा रुंदी 3.00 मीटर 
4.01 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा 
255 हेक्‍टर ओलिताखाली अपेक्षित