लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश, जाणून घ्या कारण

निलेश मोरजकर
Saturday, 15 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने बेरोजगार झालेल्या श्री. गावडे यांनी स्वतः कष्टाने शेती पिकविली होती; परंतु गव्यांनी एका रात्रीत त्यांची भातशेती फस्त केल्याने दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली.

बांदा (सिंधुदुर्ग) - पाडलोस-देऊळवाडी येथील युवा शेतकरी विशाल गावडे यांची पानतळी येथील भातशेती गव्यांनी फस्त केल्याची घटना घडली. वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश झाला आहे. 

श्री. गावडे यांच्या कुटुंबाने अपार कष्ट करत यावर्षी भातशेती केली होती. नांगरणी, मजुरी, भातबियाणे, खत यावर खर्च करत स्वतः शेतीत राबून योग्यप्रकारे लावणी केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने बेरोजगार झालेल्या श्री. गावडे यांनी स्वतः कष्टाने शेती पिकविली होती; परंतु गव्यांनी एका रात्रीत त्यांची भातशेती फस्त केल्याने दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली.

यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता काय करायचे? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. पाडलोस गावात रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे अद्यापही शेकडो एकर जमीन पडीक आहे. जर प्रशासनाने रानटी प्राण्यांचा बंदोबस्त केल्यास शंभर टक्के जमीन लागवडीखाली येईल व शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील; परंतु प्रशासनाने यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची आज गरज असल्याचे मत पाडलोसवासीयांमधून व्यक्त होत आहे.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damage to agriculture from cows banda konkan sindhudurg