निसर्गाच्या कोपाने बळीराजा सैरभैर 

पल्लवी सावंत
Wednesday, 21 October 2020

2019च्या पावसाने कोकणासह राज्याला पाण्यात डुबविले होते. 2020 मध्ये कोरोनाने संपूर्ण जग थांबविण्यास भाग पाडले. अशातच जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.

नांदगाव (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने परिसरात भातपिक जमिनीवर झोपविले अणि वन्यप्राण्यांनी त्याची पुरती विल्हेवाट लावली. यामुळे अनेकांच्या भातशेतीतील 75 टक्के पिक मातीत गेले. यामुळे वर्षभराच्या पोटगीचा प्रश्‍न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शिवाय निसर्गाच्या या कोपासमोर नक्की कोणत्या संकटाचा सामना करावा याच चिंतेत बळीराजा आहे. 

2019च्या पावसाने कोकणासह राज्याला पाण्यात डुबविले होते. 2020 मध्ये कोरोनाने संपूर्ण जग थांबविण्यास भाग पाडले. अशातच जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. भातपिकाला फुल येतानाही सरीवर सरी कोसळू लागल्या आणि लोंबीमध्ये तांदूळ भरण्याचे प्रमाण अर्ध्यावर आले. पुढे आता तयार झालेली हळवी भातशेती पावसामुळे कापताही न आल्याने डोळ्यांदेखत हे पिवळं सोनं मातीमोल होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. या दुसऱ्या नुकसानीनंतर निदान महान भातशेती चारगोटे मिळवून देईल या आशेवर बळीराजा होता; मात्र पाऊस काही विश्रांती घेता घेईना. त्यामुळे आजही पाणथळ जागी तयार झालेले पिक कापणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. जर कापायचे असेल तर दुप्पटीने मजुर मदतीला घ्यावे लागतात. त्यामुळे हा अधिकचा भार शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे. शिवाय पावसाने जमिनीवर झोपविलेले भात वन्यप्राण्यांनी खाऊन, लोळून होत्याचे नव्हते केले. यामधून शेतकरी कसा सावरणार? याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

दुष्काळात "धोंड' महिना 
सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक कोकणातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचे मुंबईतील रोजगार हिरावले. आज अनेक तरूण गावी आहेत. शेतीत आई-वडिलांना हातभार लावला. चार गोटे जास्त मिळतील, अशी आशा होती; मात्र पावसाने त्यावरही पाणी फेरले. वयस्कर आई-वडिलांना आर्थिक मदत करणारे कमविती मुले घरात बसली. पिकानेही धोका दिला. यामुळे दुष्काळात धोंड (तेरावा) महिना असे म्हणत संकटाचा मुकाबला करावा लागतो आहे. 

मदत मिळणार तरी का? 
अशी परिस्थिती आल्यावर सगळेच नेते शेतकऱ्यांचे कैवारी होतात. पंचनामे करा, ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी यांच्या मागण्या होतात; पण प्रत्यक्ष कसणाऱ्या दुसऱ्याच्या जमिनीत खंडाने पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती काय येणार हा मात्र प्रश्‍न आहे. 

बळीराजामागे शुक्‍लकाष्ट 
- 2019ला पावसाने राज्याला डुबविले 
- 2020ला कोरोनाने जग थांबविले 
- ढगफुटीसदृश पावसाने सारेच थांबले 
- 75 टक्के पिके वाया 
- कोकणातील अर्थकारणच बिघडले 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to agriculture due to rains in Sindhudurg district