शेतकऱ्यांचे नुकसान जास्त आणि भरपाई मात्र अर्धीच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

एकूण नुकसानापैकी अर्धीच रक्कम प्राप्त झाल्याने शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

चिपळूण (रत्नागिरी) : परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्‍यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीपोटी केंद्र व राज्य सरकारकडून नुकसानापैकी ६२ लाख ५८ हजारांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून येथील तहसील कार्यालयामार्फत त्याचे वाटप केले जात आहे. एकूण नुकसानापैकी अर्धीच रक्कम प्राप्त झाल्याने शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

या वर्षीही लांबलेल्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील भातशेती आडवी केली. याबरोबरच नाचणी पिकाचेही मोठे नुकसान झाले. या पावसात तब्बल ७ हजार ४५९ शेतकऱ्यांचे १ हजार ३३६. ७१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या वाईट परिस्थितीची राज्य शासनाने दखल घेऊन महसूल, कृषी विभाग व पंचायत समिती प्रशासन यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणेने ते पंचनामे केले. त्याचा अहवाल येथील तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. 

हेही वाचा - ....आणि मामाचे गावही गहिवरले! -

आतापर्यंत ५७ लाखांचे वाटप

केंद्र सरकारने या नुकसानीपोटी ४२ लाख ५८ हजार रुपयांची तर राज्य सरकारने २० लाख रुपयांची अशी एकूण ६२ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम येथील तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५७ लाख ५ हजार ९६५ रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the damage of crop compensation is half for farm in ratnagiri the waiting for second installment in ratnagiri