पर्यटनाच्या उद्देशाने उभारला, पण लाटांच्या तडाख्यात सापडला

दीपेश परब
Monday, 20 July 2020

याबाबत पाहणीचा अहवाल वरीष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळाकडे पाठवणार आहोत, असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सागरेश्‍वर समुद्रकिनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने पर्यटन वृद्धीच्या उद्देशाने उभारलेला वुड हाऊस प्रकल्पाचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. 

तालुक्‍यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्‍वर किनारी हा वुड हाऊस प्रकल्पाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेले दीड ते दोन वर्षे सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ 80 टक्के काम हे पूर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यावर उभारलेला पाया हा धसळण्यास सुरुवात झाली होती. मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते.

काल (ता.18) रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे आज पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एकबाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. 

या प्रकारची माहिती मिळताच उभादंडा ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलिसपाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण अंगाचेकर, ग्रामस्थ डुमिंग डिसोजा यांनी तत्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल वरीष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळाकडे पाठवणार आहोत, असे ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. 

या प्रकल्पाची उभारणी चुकीच्या पद्धतीने झाली असून ग्रामस्थांनी संबंधित विभागाला याबाबतच्या धोक्‍याची कल्पना दिली होती. तरीही चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प उभारला. याच्या पाया उभारण्यासाठी जे दगड वापरले होते हे आता समुद्रात वाहून जात आहेत. यामुळे भविष्यात मासेमारी करताना मच्छीमारांची जाळी फाटून नुकसान होण्याची दाट शक्‍यता आहे. 
- डुमींग डिसोजा, स्थानिक ग्रामस्थ 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to the project due to the impact of the waves in vengurla