नदीचे पात्र रुंदावले, तब्बल ३० घरांना धोका, वाचा सविस्तर....

भूषण आरोसकर
Saturday, 15 August 2020

यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कलंबिस्त-ख्रिश्‍चनवाडी येथे असलेल्या मळावाडी भागात तेरेखोल नदीचे पात्र रुंदावल्यामुळे तेथील जवळपास 30 कुटुंबियांची घरे धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी धुपप्रतिबंधक संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रवी मडगावकर यांनी केली. यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

वाचा - रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीत 69.63 कोटींचा आराखडा सादर

कलंबिस्त-ख्रिश्‍चनवाडी मळा येथे 25 ते 30 कुटुंबे पूर्वांपार पिढीपासून राहतात. या ठिकाणाहून वाहणाऱ्या तेरेखोल नदीचे पात्र पाच वर्षांत कमालीचे रुंदावत चालले आहे. मागील दोन ते तीन वर्षांत तर या नदीचे पाणी या मळा भागात ख्रिश्‍चनवाडी भागात घुसत आहे. यामुळे तेथील घरातही पाणी शिरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील  या  कर्तव्यदक्ष  पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक  

भविष्यात हानी शक्‍य 
दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नदी पात्र देखील बदलले असून तेथील घरांचा पूर्ण भाग खचून गेला आहे. यामुळे भविष्यात जीवितहानी देखील होण्याची शक्‍यता आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्याठिकाणी कायम स्वरूपी धूप प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधावी व नुकसान थांबवावे, अशी मागणी माजी सभापती तसेच या भागाचे पंचायत समिती सदस्य मडगावकर यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी ख्रिश्‍चनवाडी ग्रामस्थ आंतोन रॉड्रिग्स, जॅकी डिसोजा, आरोग्य सभापती परिमल नाईक, दशरथ पासते आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: danger of flood in sawantwadi kalambist area