esakal | सावधान ! जगबुडीने ओलांडली धोक्‍याची पातळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Danger Level Exceeded By Jagbudi River Ratnagiri Marathi News

गेले चार दिवस तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे

सावधान ! जगबुडीने ओलांडली धोक्‍याची पातळी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) - खेड शहरालगत वाहणाच्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गेले चार दिवस तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी 6.50 तर धोक्‍याची पातळी 7 मीटर इतकी आहे. रविवारी (ता. 16) रात्री जगबुडी इशारा पातळीवर वहात होती.

आज दुपारी जगबुडीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. जगबुडीप्रमाणे नारिंगी नदीचे पाणीही क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे खेडची बाजारपेठ कधीही पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. नारिंगी नदीकाठी असलेली भातशेती पाण्याखाली गेली, की या नदीचे पाणी दापोली नाका येथून बाजारात भरायला सुरवात होते.

जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट येथून बाजारपेठेकडे उसळी मारते. गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाडी आणि तळवट या पाचही धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी जगबुडी नदीला मिळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. हे पाणी कधीही बाजारपेठेत घुसण्याची शक्‍यता असल्याने व्यापारी आणि शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. 

loading image