बोर्डी पावसाने केले रौद्र रूप धारण; फळबागायतींना धोका

अच्युत पाटील 
बुधवार, 31 जुलै 2019

बोर्डी परिसरात वारा आणि पावसाने थैमान घातले असून रौद्र रूप धारण केले आहे.
-  फळबागायतींना धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोर्डी : बोर्डी परिसरात वारा आणि पावसाने थैमान घातले असून रौद्र रूप धारण केले आहे. मागच्या चार दिवसांपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. दीप अमावस्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाच नंतर पावसाचा जोर वाढला असून वाऱ्याचाही वेग वाढला आहे. त्यामुळे फळबागायतींना धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागच्या चार दिवसांपासून या भागात सतत धार पाऊस पडत आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तलाव धरण तुडुंब भरले आहेत. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. बागायतीमध्ये चिखलणी केल्यासारखा चिखल झाला आहे. बोर्डी, घोळवड, रामपूर, भिनारी, नागबन,नागनकास, खनुवडे,जळवाई परिसरात सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे चिकू बागायतीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. असे प्रयोगशील बागायतदार प्रदीप सावे यांनी सांगितले.

भातशेतीसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त मानला जातो. मात्र, या भागातील चिकू बागायती व भाजीपाला पिकासाठी नुकसानकारक असल्याचे मत प्रदीप सावे यांनी व्यक्त केले .दरम्यान, चिकू फळपिकाला पंतप्रधान हंगामी पिक विमा संरक्षण देण्यात आले आहे मात्र, यासाठी लावलेले निकष किचकट असल्याने शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांची भले होईल अशी टीका केली जात आहे. त्यामुळे मागच्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे चिकू बागायतदार हाताश झाला आहे. मागील पावसाळ्यात पावसाने लवकरच काढता पाय घेतल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने अनेक बागा अर्धमेल्या झाल्या आहेत. त्यातच आता बेसुमार पावसाने बागायतीवर मोठे संकट उभे केले आहे. 

एकूणच गेल्या चार दिवसापासून सुरू असलेला पावसाने विविध भागात थैमान घातल्याने शहरातल्या बाजारपेठेवर परिणाम झाला असून येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी चिकूची फळे खरेदी करण्यास बंदी केल्याने शेतमजुरांचा रोजगार बुडत आहे तर, बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to orchards due to Heavy rainfall in bordi