esakal | महाविकास आघाडीच्या धुसफूसीला कोकणातून सुरवात 
sakal

बोलून बातमी शोधा

Dapoli MLA Yogesh Kadam has filed a defamation suit against MP Sunil Tatkare

खासदार तटकरे यांनी नुकतेच दापोली व मंडणगड तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपुजन केले.

महाविकास आघाडीच्या धुसफूसीला कोकणातून सुरवात 

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणाला कोकणातून सुरवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


खासदार तटकरे यांनी नुकतेच दापोली व मंडणगड तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपुजन केले. हे तालुके आमदार योगेश कदम यांच्या विधानसभा मतदार संघात येतात. तटकरेंच्या या दौर्‍यात आमदार कदमांना बोलवण्यात आले नाही. विकास कामांच्या पाट्यांवरही त्यांचे नावही नव्हते. तटकरेंची ही कृती आमदार कदमांच्या जिव्हारी लागलीच. त्याशिवाय त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार संजय कदम तटकरेंच्या दौर्‍यात सहभागी होते.

विकास कामांच्या पाट्यांवर त्यांचे नावही होते. त्यामुळे आमदार कदमांचा इगो अधिक दुखावला. त्यांनी तटकरेंच्या विरोधात थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. खासदार तटकरे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर त्यांची कमांड आहे. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आमदार भास्कर जाधव यांना मंत्रीपद आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यावर वर्चस्व रहावे यासाठी जाधवांच्या विरोधात तटकरेंनी कुरघोड्या केल्या होत्या. तेव्हा जाधवांनी तटकरेंच्या विरोधात उघडपणे आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

शिवसेनेच्या तिकिटावर प्रथमच निवडून आलेले योगेश कदम यांचा दापोली मतदार संघ तटकरेंच्या लोकसभा मतदार संघात येतो. तटकरेंनी विद्यमान आमदारांना डावळून दापोलीवर आपलाच प्रभाव रहावा यासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. मात्र आपल्या विरोधातील तटकरेंच्या पहिलीच कृतीला आमदार कदमांनी तक्रारीद्वारे उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी कायम रहावी यासाठी विधानसभा अध्यक्षांनी तातडीने माझ्यावर कारवाई करावी असे तटकरेंनी यांनी सांगितले आहे. थोडक्यात तटकरेंवर विधानसभा अध्यक्ष कारवाई करणार नाही. मात्र कदम विरूद्ध तटकरे हा वाद कायम राहणार असून महाविकास आघाडीतील कुरघोडीही कायम राहणार आहे. 

हेही वाचा- भोसले, बेटकर  सध्या करतात काय? -

शिवसेनेत अनंत गीते विरूद्ध रामदास कदम असा वाद होता. लोकसभा निवडणूकीत तटकरेंच्या विरोधी गीते होते. त्यामुळे रामदास कदमांचे तटकरेंना सहकार्य मिळेल. अशी काहींना आशा होती. मात्र रामदास कदमांना दापोली मतदार संघातून काहीही करून मुलगा योगेशला निवडून आणायचे होते. कदमांनी तटकरेंना सहकार्य केले तर त्याची परतफेड विधानसभा निवडणूकीत गीते समर्थक करतील या भितीने रामदास कदमांनी गीतेंसाठी पुरेपूर प्रयत्न केले तरीही गीतेंचा पराभव झाला. मात्र कदमांचे आपल्याला सहकार्य मिळाले नाही याचे शल्य तटकरेंना अजूनही आहे. त्यामुळेच दापोलीच तटकरे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचे सांगितले जात आहे.
 

खासदार तटकरे यांनी राजकारण खुशाल करावे पण ज्या कामासाठी मी प्रयत्न केले आहे. तेथे मला डावळणे योग्य नाही. ते माझ्या हक्कावर गदा आणत आहेत म्हणूनच मी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. 

योगेश कदम, आमदार दापोली

  संपादन - अर्चना बनगे