सावंतवाडी : असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली ; मार्ग वाहतुकीस बंद 

 निलेश मोरजकर 
Wednesday, 5 August 2020

आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

बांदा(सिंधुदुर्ग) - काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील असनिये-घारपी मार्गावर रस्त्याकडेला असलेली भली मोठी दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. दरड रस्त्यावर आल्याने घारपी गावाचा संपर्क तुटला असून पावसाचा वाढणारा जोर पाहता असनिये-घारपी रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
 गतवर्षी याच रस्त्यावर असनिये-कणेवाडी येथे भूस्खलन होऊन हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे घारपी गावाचा संपर्क तब्बल महिनाभर तुटला होता. तर कणेवाडी येथील १०० हून अधिक ग्रामस्थांचे असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले होते.

आज कोसळलेली दरड गतवर्षी भूस्खलन झालेल्या परिसरानजिकच आहे. या ठिकाणी गतवर्षीही काही प्रमाणात दरड कोसळली होती. यावर्षी देखील पहिल्याच पावसात झोळंबे-घारपी मार्गावर दरड कोसळली होती. त्यावेळी भलेमोठे दगड रस्त्यावर आले होते. दरम्यान कालपासून तुफान कोसळणाऱ्या पावसाने या ठिकाणी दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन हा मार्ग बंद झाला आहे.

हे पण वाचाबंदी उठल्यानंतर चौथ्या दिवशीच लागला  ‘ब्रेक’, मच्छीमारांचा हिरमोड ....  

स्थानिकांनी दरड कोसल्ल्याची कल्पना प्रशासनाला दिली आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापनाचे कोणीही अधिकारी याठिकाणी अद्यापपर्यंत फिरकले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर्षी गणेश चतुर्थीच्या तोंडावरच दरड कोसळल्याने घारपीवासीयांना असनिये व बांद्यात येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

 
संपादन- धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darad collapsed on the Asaniye Gharpi route Road closed to traffic