esakal | गणपतीपुळेत सोमवारपासून दर्शनाची पर्वणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Darshan Facility Available In Ganpatipule From Monday

गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाकडून भक्‍तगणांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. गणपतीपुळेतील देवदर्शन गाभाऱ्यात एकावेळी एकाच व्यक्‍तीला घेता येणार आहे. अन्य जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांसाठी दिवसभर वेळ ठेवला जाईल. चार तासानंतर दुपारी स्वच्छतेसाठी मंदिर बंद राहील.

गणपतीपुळेत सोमवारपासून दर्शनाची पर्वणी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - गणपतीपुळे मंदिर सोमवारपासून (ता. 16) भक्‍तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना दर्शनासाठी राखीव ठेवले आहेत. गर्दी टाळण्यासाठी रांगेतील दोघांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्याकडे कटाक्ष राहील. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था केली असून मास्क अत्यावश्‍यक आहे.

व्हीव्हीआयपींसह खासगी व्यक्‍तींना मागील दरवाजाने दर्शन न देण्याचे कडक पाऊल मंदिर प्रशासनाने उचलले आहे. गणपतीपुळेमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये 800 ते हजार पर्यटक किनाऱ्यावर दाखल झाले होते. त्यातील कुणी मंदिराच्या कळसाचे तर कुणी बंद दरवाजासमोर उभे राहून प्रार्थनेवर समाधान मानत परतत होते. गणपतीपुळेत श्री गणपतीच्या दर्शनासाठी पर्यटक येतात.

गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाकडून भक्‍तगणांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. गणपतीपुळेतील देवदर्शन गाभाऱ्यात एकावेळी एकाच व्यक्‍तीला घेता येणार आहे. अन्य जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांसाठी दिवसभर वेळ ठेवला जाईल. चार तासानंतर दुपारी स्वच्छतेसाठी मंदिर बंद राहील.

मंदिरात गर्दी टाळण्यासाठी पाच फुटाचे अंतर, मंदिर परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था, हातपाय धुण्यासाठी जागोजागी नळ, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे तापमान आणि ऑक्‍सिजन तपासणी केली जाईल. मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आतील स्टॉल किंवा अन्य भाग प्लास्टिकने झाकला जाणार असून पर्यटकांचा कर्मचाऱ्यांशी संपर्क येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. 

"विशेष' दर्शन नाही 
अनेकवेळा पुढारी, अधिकारी यांसह महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्‍ती देवस्थान प्रशासनाकडून दर्शनासाठी प्रयत्न करतात. सध्याच्या परिस्थितीत अशा व्यक्‍तींसाठीची व्यवस्था न करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. 

दर्शनासाठी खुले भक्‍तगणांसाठी निकष निश्‍चित केले असून गोंधळ होऊ नये म्हणून देवस्थानकडून विशेष काळजी घेतली गेली आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी भक्‍तगणांनाही आवाहन केले आहे. 
- डॉ. विवेक भिडे, सरपंच, देवस्थान 

कोरोनातून सावरतानाच अर्थकारण कोलमडण्याचे दुसरे संकट होते. मंदिर परिसरातील दुकान चालकांसह फेरीवाले, हॉटेल, लॉजिंगमधील कर्मचारी अडचणीत आले असते. शासनाच्या निर्णयाचा फायदा निश्‍चितच दिसून येईल. 
- प्रमोद केळकर, हॉटेल व्यावसायिक 

टाळेबंदीमुळे श्रींच्या दर्शनासाठी आम्ही ग्रामस्थ आतुर झालो होतो. भाद्रपदी गणेशोत्सवातही कोरोनामुळे श्रींचे तीर्थ घरी आणून पूजा-अर्चा करायला मिळालेली नव्हती. श्रींच्या आशीर्वादामुळे हळूहळू कोरोना कमी झाला आहे. मंदिर दर्शनासाठी खुले होत असल्यामुळे अतिशय आनंद होत आहे. 
- महेश ठावरे, ग्रामस्थ, गणपतीपुळे 
 

 
 

loading image