दुर्दैवी! आयुष्याच्या परीक्षेत नापास विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण

निलेश मोरजकर
Monday, 3 August 2020

आपले यश पाहण्यासाठी तो या जगात नाही आहे; मात्र त्याचे परीक्षेतील यश पाहून त्याचे आईवडील अजूनही त्याच्या आठवणीने रडताहेत.

बांदा (सिंधुदुर्ग) - शेर्ले-राऊतवाडी येथील पांडुरंग प्रसाद राऊत या दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने महिनाभरापूर्वी विष प्राशन करून जीवन संपविले. आयुष्याच्या परीक्षेत नापास झालेल्या पांडुरंगने दहावीच्या परीक्षेत मात्र 85.60 टक्के गुण मिळविले आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते; मात्र अभ्यासात हुशार असूनही शेर्ले राऊतवाडी येथील पांडुरंग प्रसाद राऊत या 16 वर्षीय विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या खूपच जिव्हारी लागली आहे. पांडुरंगने गणित, इंग्रजी विषयात लक्षवेधी गुण मिळविले आहेत. 

शेर्ले येथील पांडुरंग राऊत या 16 वर्षीय मुलाने 27 जून रोजी विष प्राशन केले होते. नातेवाइकांनी त्याला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल काॅलेजमध्ये (गोमेकाॅ) नेण्यात आले. आठ दिवस अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. 

वाचा - चाकरमान्यांचा ओघ सुरूच; पण अशी होत आहे गैरसोय

पांडुरंग हा अभ्यासात हुशार, प्रामाणिक व मेहनती मुलगा होता. जगदीश या टोपणनावाने तो गावात परिचित होता. मडूरा हायस्कूलमध्ये अभ्यासात हुशार, अशी त्याची ओळख होती. घरच्या गरीबीमुळे मात्र तो कायम नैराश्येत असायचा. आपल्या कुटुंबाची गरीबी कधी संपणार? असा प्रश्‍न तो घरच्या मंडळींकडे कायम उपस्थित करायचा. याच नैराश्‍यातून त्याने विष प्राशन केले व त्याचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. पांडुरंगच्या आई-वडीलांसाठी हा मोठा धक्का होता.

आपला मुलगा शिकून मोठा व्हावा, चांगल्या अधिकारी पदावर नोकरी करावी, अशी त्यांची मनिषा होती. त्यासाठी ते अपार मेहनतही घेत होते. पांडुरंग अभ्यासात हुशार असल्याने त्याच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षाही होत्या; मात्र ध्यानीमनी नसतानाही नैराश्‍येतून पांडुरंगने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविल्याने राऊत कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

हेही वाचा - हायवे ठेकेदारासह देखरेख कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव देणार... कणकवलीवासियांना कुणी केले आश्वस्त? 

पांडुरंगला दहावीच्या परीक्षेत गणित विषयात 94, विज्ञानमध्ये 91 तर इंग्रजी विषयात 84 गुण मिळाले आहेत. एकूण 85.60 टक्के गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आपले यश पाहण्यासाठी तो या जगात नाही आहे; मात्र त्याचे परीक्षेतील यश पाहून त्याचे आईवडील अजूनही त्याच्या आठवणीने रडताहेत. आईवडिलांच्या अपेक्षा अधांतरी ठेवत त्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead students pass the matriculation examination konkan sindhudurg