रत्नागिरीकरांची वाढतीये चिंता ; मृत्यूदरात होतीये वाढ

राजेश कळंबटे
Tuesday, 29 September 2020

नवीन रुग्ण सापडण्याचा टक्का घसरला आहे. तर बरे होणार्‍यांचे प्रमाण राज्याच्या तुलनेत 8 टक्क्यांनी अधिक आहे.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचा टक्का घसरला आहे. तर बरे होणार्‍यांचे प्रमाण राज्याच्या तुलनेत 8 टक्क्यांनी अधिक आहे. बरे होण्याचा राज्याचा दर 75. 86 तर जिल्ह्याचा दर 83. 76 टक्के आहे, मात्र मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत वाढत असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.48 टक्के आहे.
 
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे 27 सप्टेंबर अखेर 250 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट अखेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 135 एवढी होती. मात्र या महिन्यात तब्बल 115 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा वेगही या महिन्यात वाढला आहे. सध्याचा मृत्यूदर हा 3. 48 टक्के एवढा आहे. मृत्यूची वाढती टक्केवारी जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. त्यातच या एका महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता जिल्ह्यासाठी नक्कीच ही चिंतेची बाब आहे. 

हेही वाचा - पावसाची विश्रांती, भात कापणीला वेग 

मार्च महिन्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी सुरु झाली. त्यानंतर हळूहळू त्यात शिथिलता दिली गेली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण सापडू लागले आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गणेशोत्सवाच्या कालावधीत संपर्क वाढल्यामुळे बाधितांची जिल्ह्यातील आकडेवारी पाच हजारावर पोहचली. रुग्ण वाढत असले तरीही आरोग्य विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्यामुळे जिल्ह्यात नियंत्रण शक्य होत आहे. 

रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य विभागाकडून चौदा केंद्र सरु केलेली आहेत. बरे होणार्‍यांची संख्या गेल्या चार दिवसात तिप्पट झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 6,016 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 42 हजार लोकांच्या तपासणीमध्ये 7,172 रुग्ण बाधित सापडले. सध्या 800 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 75.86 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा दर 83.75 टक्के आहे. 8 टक्केपेक्षा अधिक रुग्ण बरे होत आहेत. जिल्ह्यात मृत्यूचा दर वाढत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात मृतांची संख्या वाढली आहे. 

हेही वाचा - सीआरझेड सुनावणीस विरोध, मालवणात जोरदार घोषणा  

राज्याचा मृत्यूदर 2.70 टक्के तर जिल्ह्याचा दर 3.46 टक्के आहे. खासगी रुग्णालयात मृत झालेल्यांची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्येक दिवशी झाली नव्हती. मागील पंधरवड्यात प्रशासनाने ही नोंद करण्यास सुरवात केल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यातील मृतांचा आकडा 250 वर पोचला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझी कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. रुग्ण उशिरा दाखल झाल्यामुळे उपचारासाठी कालावधी कमी मिळतो. त्यादृष्टीने आरोग्य विभाग नियोजन करत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death rate of corona patients in ratnagiri increased compared to state but the patient registration less in rangatgiri