esakal | सिंधुदुर्गात होम आयसोलेशन बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय

बोलून बातमी शोधा

0

तालुका स्तरावरील वसतिगृहे व महाविद्यालये अधिगृहित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गात होम आयसोलेशन बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठीचे होम आयसोलेशन बंद करण्याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. ही माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ``जिल्हाधिकारी आढावा बैठक सोमवारी (ता. 12) घेणार आहेत. यात कोरोना नियंत्रण उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. यावेळी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील वसतिगृहे व महाविद्यालये अधिगृहित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.``

ते म्हणाले, ``वीकएंड लॉकडाउन जनतेच्या भल्यासाठी आहे. गेल्या वर्षी असलेल्या लॉकडाउनप्रमाणेच शनिवारपासून (ता. 10) दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन लागू झाले आहे. वैद्यकीय सुविधा व अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे.``

सामंत म्हणाले, "जिल्ह्यात केवळ 1170 कोरोना लस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 56 लसीकरण केंद्रे आहेत. यातील सध्या तीनच सुरु आहेत. दोन लाख लशीची मागणी केली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. अजून एक हजार उपलब्ध होणार आहेत. खासगी हॉस्पिटलना ही इंजेक्‍शन पुरवली जाणार आहेत. जिल्ह्यात 1014 बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 314 विलगीकरणासाठी उपलब्ध आहेत.'' 

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, खासदार विनायक राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, जान्हवी सावंत, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते. 

संपादन : विजय वेदपाठक