
कोकणात आंबा व काजू ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लावण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. पण प्रतिकूल हवामान, चक्रीवादळ यामुळे यंदा शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत मंदावत आहे.
अरे बापरे ! यंदा काजू उत्पादनही घटणार
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आंब्याबरोबरच यंदा काजू पिकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले काजू पीक धोक्यात आले आहे. काजूचे यंदा जेमतेम 50 टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सातत्यपूर्ण थंडीचा अभाव असल्याने दुसऱ्या बाजूने याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
कोकणात आंबा व काजू ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लावण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. पण प्रतिकूल हवामान, चक्रीवादळ यामुळे यंदा शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत मंदावत आहे. आंबा व काजू यांच्या फळ पिकाचा यंदा जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पुढे गेला. काजू पिकाला सातत्यपूर्ण थंडी मिळत नसल्याने याचा परिणाम मोहर प्रक्रिया व फळ धारणेवर दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काजू पिकाची बऱ्यापैकी फळधारणा झाली आहे; मात्र उशिराच्या हंगामा नंतरही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे टी मॉस्क्युटो किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला.
हेही वाचा - थ्री डी रंगावलीमध्ये राहुल कळंबटे प्रथम
अनेक ठिकाणी मोहराचा फुलोरा होण्यापूर्वी या रोगाची लागण झाल्याने हे काजू पीक संकटात सापडले. सुरुवातीच्या टप्प्यात आलेला मोहोरावर खार पडल्याने हा मोहर जळून गेला. ज्याठिकाणी फवारणी योग्य पद्धतीने झाली त्याठिकाणचा काजू वगळता अनेक ठिकाणी मोहोराची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नाही. पुरेशी थंडी न मिळाल्यामुळे मोहर सुकून पुन्हा पालवी आली. याचा फटका आता थेट काजू उत्पादनावर दिसून येणार आहे. शेतकऱ्यांच्या मते गतवर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्के काजूचे उत्पादन हाती येणार आहे. यातही साशंकता दिसून येत असून एवढे उत्पादन मिळणेही कठीण होऊ शकते. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी फवारणी करून काजू उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला; मात्र वातावरणीय बदल व थंडीचा अभाव यामुळे मोठी समस्या निर्माण झाली.
हेही वाचा - बापरे ! कणकवलीत हा कसला भ्रष्टाचार
गेल्या आठवड्याभरात पारा खाली राहत आहे. थंडीमुळे काजूची मोहोर प्रक्रिया गतिमान झाली आहे; मात्र दिवसा व काही रात्रीच्यावेळी ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेशी थंडीत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच फळधारणा व मोहन प्रक्रिया धीम्या गतीने होत आहे. थंडीत सातत्य नसल्याने बागायतदारांची डोकेदुखी वाढत आहे.
दर कोसळण्याची भीती
याचे परिणाम पुढे काजूच्या दरावरही दिसून येणार आहेत. यामुळे बाजारपेठेत काजूचा जेमतेम दर राहणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काजुच्या कमी उत्पन्नामुळे कारखानदारांकडून परदेशी काजूची आयात होणार आहे. त्यामुळे यंदा कारखान्यात आयात केलेला काजू जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक बाजारपेठेतही विक्री 120 रुपयापेक्षा पुढे जाईल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया काजू बागातदारांकडून देण्यात येत आहे.
""यंदा काजूचे फारसे उत्पादन हाती येणार असे वाटत नाही. 50 टक्के उत्पादन यावेळी प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. दहा टक्के चार - पाच पिकावर फवारणी करण्यात आली. याचा परिणाम आता दरावरही होणार आहे. बऱ्यापैकी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.''
- हनुमंत गावडे, शेतकरी तळवडे
"" लांबलेला पाऊस व अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण याचाफटका आंबा व काजू या दोन्ही पिकांना सहन करावा लागत आहे. या दोन्ही पिकांना सातत्याने थंडीची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दहा ते पंधरा दिवस सलग किमान तापमान राहिले असते तर मोहोर प्रक्रिया गतिमान झाली असती; मात्र यावेळी तसे होताना दिसत नाही. यामुळे आंबा व काजूचे उत्पादन घटणार आहे.''
- यशवंत गव्हाणे, कृषी सहाय्यक, सावंतवाडी