सौरऊर्जेच्या वापरातून वीज बिलात केली कपात

मकरंद पटवर्धन
सोमवार, 20 मे 2019

छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६ लाखांचे पॅनेल बसवले आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर २०१८ पासून एप्रिल २०१९ पर्यंत शाळेच्या वीज बिलात घट झाली आहे. 

रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६ लाखांचे पॅनेल बसवले आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर २०१८ पासून एप्रिल २०१९ पर्यंत शाळेच्या वीज बिलात घट झाली आहे. 

या संदर्भात माजी विद्यार्थी केदार दातार म्हणाले, शाळा सोडल्यावर दहा वर्षांनी २००४ मध्ये व गेल्या वर्षी बॅचचे संमेलन झाले. त्यात शाळेसाठी गरजेची गोष्ट देण्याचे ठरवले. आता तिसरे संमेलन होत आहे. मी मित्रासोबत पुण्यात सोलारिस इको सोल्यूशन्सचे काम पाहतो. वीज बिल कमी करणारी सौर यंत्रणा बसवण्याचा विचार पुढे आला. सीए देवदत्त माईणकर याने मुंबईतील साई एंटरप्रायजेसकडून सीएसआर फंडातून आर्थिक मदत मिळवली. प्रद्योत जोगळेकर यांनी महावितरणशी समन्वय व प्रकल्प पूर्ण होईपर्यंत काम केले. या प्रकल्पातून वार्षिक १२ हजार युनिट्‌स वीज तयार होईल.

स्नेहसंमेलनादरम्यान या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबा परुळेकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्याध्यक्ष ॲड. सुमिता भावे म्हणाल्या, शिक्षकांनी पर्यावरण, कचरा निर्मूलन आदीचे संस्कार केले त्याचे पालन आजही विद्यार्थी करत आहेत. भविष्यात संस्थेच्या इतर शाळेतही असा प्रकल्प राबवण्याचा मानस आहे. यावेळी १९९४ च्या बॅचला शिकवणारे आजी-माजी शिक्षक उपस्थित होते. विश्‍वेश जोशी यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ यांनी आभार मानले.

प्रदूषणविरहित ऊर्जा
सोलर नेट मीटरिंग यंत्रणा असल्याने गरजेप्रमाणे महावितरणची वीज घेऊ शकतो व त्यांना विक्री करू शकतो. थ्री फेज जोडणी आहे. वापर व विक्री पाहून सरासरी वीजदर महावितरण देते. घरगुती व संस्था, शाळांना वीज बिलात बचत करता येईल. ही ऊर्जा प्रदूषणविरहित असून प्रकल्पाला २५ वर्षांची गॅरंटी असल्याने गुंतवणूक केलेल्या रकमेवर २५० टक्के फायदा होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decrease in electricity bill by use of Solar energy