कोकणात एचआयव्हीबाधित बालकांच्या संख्येत घट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

रत्नागिरी जिल्हा; साडेतीन वर्षांत ६१६ पॉझिटिव्ह रुग्ण, टाळेबंदीच्या काळात ५९ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात एचआयव्ही निर्मूलनासाठी प्रभावी अभियान राबविले जात आहे. मात्र, तरी हे रुग्ण आढळत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यात ६१६ एचआयव्ही रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या सात महिन्यांच्या कालावधीतही ५९ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे एचआयव्ही निर्मूलनाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर कायम आहे. मात्र, एचआयव्ही बाधित बालकांची संख्या रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

जिल्ह्यात २००० मध्ये एचआयव्ही विभागाची स्थापना झाली. जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात येते. गेल्या साडेतीन वर्षात १ लाख ६७ हजार ६४२ सर्वसामान्य रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये ६१६ एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यंदा आक्‍टोबर अखेर १३ हजार ८६५ रुग्णांच्या झालेल्या तपासणीत ५९ नवे एचआयव्ही रुग्ण आढळले. तर चार गरोदर महिलांचा यात समावेश आहे. एचआयव्ही रोगाबाबत प्रभावीपणे जनजागृती सुरू असली तरीही रुग्ण संख्या रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही. दरवर्षी दीडशेहून अधिक एचआयव्ही बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

३२ बालकांचा रिपोर्ट निगेटिव्ह
एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करून मृत्यूदर रोखण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. गरोदर मातेकडून नवजात बालकांना होणारे एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यात आरोग्य विभागाला पूर्णतः यश आले आहे. एचआयव्ही पॉझिटीव्ह महिलांच्या ३२ बालकांची अठरा महिन्यानंतर तपासणी करण्यात आली. सर्व बालके निगेटीव्ह आढळली. प्रसुतीपूर्व योग्य उपचार केल्यामुळे सर्व बालकांचे संरक्षण झाले आहे. 

हेही वाचा- माऊलीला रडू कोसळले अन्  दिव्यांगांना मिळाले ‘सन्मानाने अन्न’ -

गुरुप्रसाद, जागृती मदतीला..
ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. अशा बालकांची जबाबदारी इतर नातेवाईकांनी घेतली असून औषध, उपचाराचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी गुरुप्रसाद, जागृती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे.

तीन वर्षांत ५७२ बाधित
२०१७-१८ मध्ये ५४ हजार ४५४ रुग्णांची तपासणी झाली. त्यामध्ये २३२ जण तर चार गरोदर महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या. २०१८-१९ मध्ये ४६ हजार १९९ रुग्णाची तपासणी केली. यात १६० रुग्ण तर सहा गरोदर महिला पॉझिटिव्ह आढळल्या. २०१९-२०२० मध्ये ५६ हजार १२४ रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये १६५ जण तर पाच गरोदर महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्या.

 संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in the number of HIV positive children ratnagiri