चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणातील गळतीने पाणीसाठ्यात घट 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 May 2019

एक नजर

  • चिपळूण तालुक्‍याच्या टोकाला असलेल्या तिवरे धरणास लागलेल्या गळतीने धरणातील पाणीसाठ्यात घट. 
  • या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड. 
  • वेळेत दुरुस्ती न केल्यास तिवरेतील विविध वाड्यांसह दसपटीतील चार ते पाच गावांना धोका पोहोचण्याची शक्‍यता. 

चिपळूण - तालुक्‍याच्या टोकाला असलेल्या तिवरे धरणास लागलेल्या गळतीने धरणातील पाणीसाठा कमी झाला. शिवाय या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले आहे. याची वेळेत दुरुस्ती न केल्यास तिवरेतील विविध वाड्यांसह दसपटीतील चार ते पाच गावांना धोका पोहोचण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, धरणाचे पाणी नदीत येत नसल्याने नदीकिनारील पाणी योजनांच्या विहिरी आटल्याने कडक उन्हाळ्यात टंचाईची दाहकता वाढत आहे. 

दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले तिवरे धरण 2000 रोजी पूर्णत्वास गेले. गेल्या काही वर्षात या धरणाची फारशी दुरुस्ती झालेली नाही. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होतो. दोन वर्षापूर्वी धरणाला लहानशी गळती लागली होती. गतवर्षी या गळतीत वाढ झाली.

दरम्यान, गळतीमुळे ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यानंतर आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांनी गतवर्षी संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतरही दुरुस्तीला वेग आला नाही. गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाजाशेजारीच मोठे भगदाड पडले आहे. धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणीसाठाही कमी झाला. याबाबत प्रशासनाकडे माहिती देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. धरणातील पाणी नदीत येत नाही.

नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने काही गावात टॅंकर सुरू झाले आहेत. पावसाळ्यापूर्वीच धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. 

धोक्‍याच्या छायेतील गावे, वाड्या 
धरण परिसरात तिवरेतील भेंदवाडी, गंगेचीवाडी, फणसवाडी, गावठाण आदी वाड्या आहेत. नदीकिनारीच ओकले, कादवड, वालोटी, रिक्‍टोली ही गावे वसली आहेत. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोचण्याचा संभव आहे. यातून तिवरेसह नदीकाठच्या गावांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

तिवरे धरणास पडलेले भगदाड आणि लागलेल्या गळतीची माहिती आम्ही प्रशासनास दिली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष होते. दसपटीत मोठ्या प्रमाणात टंचाई असतानाही धरणातील पाणी साठ्याचा उपयोग होत नाही. दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांना किंमत मोजावी लागणार आहे. याकडे येथील स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारीही डोळेझाक करीत आहेत. 

- स्वप्नील शिंदे, युवक तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in water supply in Tivare dam due to leakage