कोनाळ वनविभागातील कारभाराची चौकशीची करा अन्यथा....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोनाळ वनविभागात बांबू लावण्यासाठी अन्य गावातील मजूर का आणले याची चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई करावी

साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) - कोनाळ वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांनी येथील वनक्षेत्रापालांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी गेली पंचवीस वर्षे कोनाळ गवसवाडी येथे राहते. या काळात मी वनकर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि तिथल्या जंगलांमध्ये होणारे गैरव्यवहार मी पाहत आहे. त्या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. ते पुरावे आपण कोनाळ वनपाल यांच्या निदर्शनास आणून दिले होते; पण त्यांनी त्याविरोधात कारवाई करण्याऐवजी या प्रकरणात लक्ष घालू नये, घातल्यास त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. त्यामुळे आपण या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरंगे येथील निर्णित क्षेत्रातील झाडांची तोड करून ती परस्पर विकली जात आहेत, कोनाळ वनसमितीसाठी केंद्र शासनाकडून कोनाळ वनविभागाकडे आलेला निधी कुठे वापरला गेला की एकाच्या खात्यावर तो जमा करून नंतर तो परस्पर इतरांच्या खात्यावर टाकून हडप केला गेला याची चौकशी व्हावी, कोनाळ वनविभागात बांबू लावण्यासाठी अन्य गावातील मजूर का आणले याची चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई करावी. आपण 14 ऑगस्टपर्यंत चौकशी व कारवाई न केल्यास पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना पाठविल्या आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand Of Inquire About Management Of Konal Forest Department