Demand Of Ratrani Bus From Sawantwadi
Demand Of Ratrani Bus From Sawantwadi

सावंतवाडीकरांना का हवी पुन्हा "रातराणी' ?

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकण-मुंबईचे नाते सर्वश्रृत आहे. रेल्वे यायच्या आधी या दोन प्रांतांना जोडणारा राज्य परिवहन महामंडळाची "रातराणी' हा महत्त्वाचा दुवा होता. खासगी गाड्यांचे फोफावलेले प्रमाण आणि रेल्वेमुळे विशेषतः तळकोकणातून सुटणाऱ्या "रातराण्या' बंद झाल्या. आता एसटीच्या ताफ्यात स्लिपर कोच दाखल झाल्याने सावंतवाडीतून पुन्हा "रातराणी'ची मागणी वाढू लागली आहे. 

एसटी महामंडळाने अलीकडेच चालू केलेल्या देवगड-बोरिवली या स्लिपरकोच एसटीप्रमाणे सावंतवाडी-बोरिवली एसटी ही बससेवा सुरू करा, अशी मागणी आता या तालुक्‍यातून होत आहे. खासगी बसकडून होणारी लूट व मनमानीला कंटाळून ही मागणी जोर धरू लागली असून महामंडळाने याकडे लक्ष दिल्यास एसटीच्या उत्पन्न व प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने हे पाऊल सकारात्मक ठरू शकते. 

1972 मध्ये रातराणीची सुरुवात

जिल्हा एसटी महामंडळाच्या ताब्यात आलेल्या स्लिपर बस एसटी ही देवगड-बोरवली या लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आली. मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना ही गाडी सध्या सोयीची ठरत आहे. महाराष्ट्र सरकारने 1972 मध्ये तळकोकणातून रातराणी ही बससेवा सुरू करण्याचा पहिला प्रयोग जिल्ह्यातून सावंतवाडी येथून सुरू केला. ही गाडी सायंकाळी सावंतवाडीतून सुटून दुसऱ्यादिवशी मुंबईत पोचायची. दीर्घकाळ चाललेली ही सेवा पुढे खासगीकरणाला प्रोत्साहन दिल्यामुळे बंद झाली. येथील एसटी आगारातून 1972 मध्ये सावंतवाडी-बोरिवली ही बस सेवा "रातराणी' या नावाने सुरू झाली. जवळपास दहा वर्षांपूर्वी ही सेवा जिल्ह्यातून कायमचीच बंद झाली.

सावंतवाडी-बोरिवली बसची मागणी

विजयदुर्ग - बोरिवली आणि देवगड-बोरिवली या दोनच बसफेऱ्या जिल्ह्यात आतापर्यंत सुरू आहेत. सावंतवाडीचा विचार करता पूर्वी सावंतवाडी-बोरिवली या बससाठी दोडामार्ग व बांदा येथील मुंबईला जाणारे प्रवासी तेव्हा सावंतवाडीत येऊन या बसने प्रवास करायचे. ही गाडी बंद केल्याने त्या काळात प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी आंदोलन केले होते. आंदोलनामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती; मात्र महामंडळाच्या तथाकथित अधिकाऱ्यामुळे चार महिन्यांत ही सेवा पुन्हा बंद पाडली. प्रवासी वर्गातून व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून वारंवार मागणी करूनही ही सेवा आजपर्यंत सुरू झालेली नाही.

एसटी नसल्याने खाजगी गाड्यांची मक्‍तेदारी

एसटी महामंडळी प्रवासी वर्गाचा मुद्दा पुढे करत ही बस सुरू करताना टाळाटाळ करत आहेत. सांवतवाडी, बांदा व दोडामार्ग या तीन ठिकाणावरून (गोवा बस वगळून) दिवस-रात्र 11 खासगी गाड्या मुंबईला धावतात. या सर्वच्या सर्व गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. या गाड्यांना वारेमाप तिकीट असताना एसटी महामंडळालाच प्रवासी का मिळत नाही? हा प्रश्‍न आहे. आता परिस्थिती बदलली आहे. झाराप पत्रादेवी महामार्ग झाल्यानंतर खासगी गाड्या शहराबाहेरून जातात. प्रवाशांना झारापला उतरले जाते. एसटी नसल्याने खाजगी गाड्यांची मक्‍तेदारी आहे. यातच महामंडळाने देवगड येथे सुरू केली आरामदायी पुश बॅग सिट असलेली बस चांगली चालली आहे. त्याच धर्तीवर येथून रातराणी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. 

आरोंदा परेल बससेवा बंद 

सावंतवाडी रातराणी ही बससेवा सुरू असताना त्यावेळी आरोंदा ते परेल ही बससेवा सुरू होती. ही सेवाही बंद पडली. आरोंदा येथील प्रवासी घेऊन तेथून वेंगुर्ले-कुडाळ मार्गे ही बस परेल येथे जात असे. या बसलाही भरपूर मागणी होती; मात्र खासगीकरणात या बसेस आज बंद आहेत. 
 

सावंतवाडीतून सुरू झालेली रातराणी ही सावंतवाडी-बोरिवली या बसची प्रवासिी वर्गाच्या दृष्टीने नितांत गरज आहे. खासगी बसवाल्याकडून होणारी लुबाडणूक व अन्याय लक्षात घेता त्यांना धडा शिकविण्यासाठी देवगड-बोरिवलीच्या धर्तीवर ही सेवा सावंतवाडीतून सुरू व्हावी, तसेच लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे. 
- वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, जिल्हाध्यक्ष, एसटी प्रवासी संघटना  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com