मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी सहा कोटींची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तालुक्‍याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची निर्मिती 2001 ला करण्यात आली.

खेड ( रत्नागिरी ) - खेडच्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. दुरुस्तीच्या नावाखाली गेली 12 वर्षे बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तालुक्‍याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची निर्मिती 2001 ला करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभे राहिल्याने खेडच्या नाट्य चळवळीला चालना मिळाली. मराठी रंगभूमीवरील अनेक दर्जेदार नाटकांच्या संवादाने नाट्यगृहाच्या भिंती चांगल्याच सुखावल्या. तालुक्‍यातील नवोदित कलाकारांनाही आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपिठ मिळाले. मात्र हे फार काळ टिकले नाही. नाट्यगृहाच्या देखरेखीकडे लक्ष न दिले गेल्याने 2001 साली उभे राहिलेल्या या नाट्यगृहाला 2008 साली म्हणजे केवळ 7 वर्षात घरघर लागली. 

2008 ला नाट्यगृहात एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचा कार्यक्रम सुरू असतानाच नाट्यगृहाच्या व्हरांड्याच्या छताचा काही भाग कोसळला. यावेळी मोठा अनर्थ टळला. त्यानंतर नाट्यगृहात कार्यक्रम सुरू असतानाच दोन पंखे निखळून पडले. सुदैव त्यावेळीही कुणाला दुखापत झाली नव्हती. या घटनेनंतर नाट्यगृह डागडुजीसाठी बंद करण्यात आले. तब्बल 12 वर्षे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरुच आहे. कोट्यवधीचा शासकीय निधी दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केला जातो आहे. मात्र 2008 पासून नाट्यगृहाचा पडदा अद्याप बंदच आहे. आता यासाठी आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाकरे यांची भेट घेऊन 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी निधी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Rs 6 crore For Repair Of Meenatai Thackeray Drama Center