उमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

प्रभाग समित्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2013 मध्ये उमेद अभियानाला प्रारंभ झाला. बचतगटाच्या माध्यमातुन सक्षमीकरण करण्याचा हेतु असलेल्या अभियानातर्गंत गावागावात बचत गट स्थापन करण्यात आले.

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी मागणी बचतगटांच्या प्रभाग समित्यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन येथील तहसिलदारांना दिले आहे. 

प्रभाग समित्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2013 मध्ये उमेद अभियानाला प्रारंभ झाला. बचतगटाच्या माध्यमातुन सक्षमीकरण करण्याचा हेतु असलेल्या अभियानातर्गंत गावागावात बचत गट स्थापन करण्यात आले. ग्रामस्तरावर ग्रामसंघ आणि प्रभाग स्तरावर प्रभाग संघ तयार करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातुन शेकडो महिला जोडल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी राहीली आहे. ही चळवळ दिवसेंदिवस भक्कम होत असताना शासनाने 10 सप्टेंबरला या अभियानात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्ती रोखण्याचे पत्र काढले.

शासनाच्या या निर्णयामुळे बचत गटाच्या सक्षमीकरणाला खीळ बसणार आहे. या अधिकाऱ्यांना नियुक्ती न दिल्यास बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन कोण करणार असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे उमेदतर्गंत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी मागणी प्रभाग समिती संघानी निवेदनातुन केली आहे. 

हे निवेदन कोळपे प्रभाग समिती अध्यक्षा शरमीन काझी, लोरे प्रभाग समिती अध्यक्षा उमा कदम, गीता पाटील, श्रेया कदम, पूजा रावराणे, निशिगंधा माळकर, सुप्रिया मोहीते, सायली रावराणे, श्रीमती लिंगायत यांनी नायब तहसिलदार ए. के. नाईक यांनी दिले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand Of Self Help Group Committees For Re Appointment Of Aspiring Employees