esakal | शिक्षक भरतीसाठी ग्रामविकास मंत्र्यांना साकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Demand Of Teacher Recruitment To Rural Development Minister

प्रशासनाच्या रेंगाळलेल्या कारभारामुळे शिक्षक भरती कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. राज्य सरकारने 4 मे 2020 रोजी वित्त विभागाच्या एका पत्रकाद्वारे नोकरभरतीवर स्थगिती आणली. त्यामुळे राज्यभरातील लाखो डीएड, बीएडधारकांनी संताप व्यक्त केला आहे.

शिक्षक भरतीसाठी ग्रामविकास मंत्र्यांना साकडे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - तत्कालीन सरकारने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यातही मागासवर्गीयांची पदे 50 टक्के कपात केली. ही रिक्त पदे याच भरतीत भरण्यात यावीत आणि रखडलेली भरती पूर्ण करावी, असे साकडे राज्यातील डीएड, बीएड धारकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार रोहित पवार यांना घातले. 

प्रशासनाच्या रेंगाळलेल्या कारभारामुळे शिक्षक भरती कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. राज्य सरकारने 4 मे 2020 रोजी वित्त विभागाच्या एका पत्रकाद्वारे नोकरभरतीवर स्थगिती आणली. त्यामुळे राज्यभरातील लाखो डीएड, बीएडधारकांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचे कारण सांगत स्थगिती दिलेल्या शिक्षक भरतीला वगळावे यासाठी राज्यभरातून सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे.

वेगवेगळे हॅशटॅग वापरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहा वर्षे भरतीसाठी वाट बघणाऱ्या तरुणाईला न्याय द्या, 2017 पासूनची लांबवलेली प्रक्रिया पूर्ण करा, मागास वर्गीयांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. 

कोरोनामुळे रखडलेली आणि आर्थिक कारणे देऊन स्थगित केलेली भरती सुरू करावी, मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50 टक्‍के जागा याच भरतीत कराव्यात यासाठी राहुल खरात व सहकाऱ्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. 25 ऑगस्टला मुंबईत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट या शिष्टमंडळाने घेतली.

उर्वरित शिक्षक भरतीला परवानगी देण्याची विनंती आबा माळी, दत्ता नागरे, योगेश जाधव, गजानन बहिवळ, राहुल खरात यांनी केली. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे लाखो डीएड, बीएड धारकांच्या व्यथा मांडण्यात आल्या. पुढील आठवड्यात उर्वरित शिक्षकभरतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस राज राजापूरकर यांचे विशेष सहकार्य यासाठी मिळाले. 

अजून किती वर्षे लांबवणार? 

12 हजार शिक्षकांची पदे भरणार अशी घोषणा करून 2017 पासून सुरू असलेली भरती अद्याप पूर्ण झालेली नाही. पहिली निवड यादी 9 ऑगस्ट 2019 ला जाहीर झाली. 16 ऑगस्ट रोजी जाहीर होणारी निवड यादी अद्याप लांबली आहे. भरतीतील केवळ अडीच ते तीन हजारपदे पहिल्या निवड यादीतून भरली गेली. परंतु दुसरी यादी व उर्वरित प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक पदांसाठी पात्र अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत.