Chiplun : वाशिष्ठी स्वच्छतेचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

वाशिष्ठी स्वच्छतेचा निर्धार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या विविध उगम स्थानांपैकी एक उगम हा चिरणी येथील सोमेश्वर मंदिरापासून होतो. गेल्या अनेक वर्षात ही नदी अनेक ठिकाणी गाळाने भरली असून विविध कारणाने येथील जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे या नदीने मोकळा श्वास घ्यावा, नियमितपणे नदीत पाणीसाठा वाढावा, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या कामासाठी नाम फाउंडेशनची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमास मार्गदर्शन करण्याची कामगिरी जलदूत शहानवाज शाह यांच्यावर सोपवली असून त्याना खास निमंत्रित केले होते.

जलसेवक विष्णू आंब्रे यांनी पुढाकार घेत ग्रामसभेत नदीतील गाळ काढण्याविषयी ग्रामसभेत चर्चा करण्याची विनंती केली. जलदूत शाहनवाज शाह यांनी जीवनात पाण्याचे महत्त्‍व, आजच्या जगात पाण्याचे नियोजन नसल्याने भविष्यातील धोके सांगितले. चिरणी गावातील उपलब्ध नैसर्गिक जलस्रोत्र व त्यावर लोकसहभागातून काम कसे करता येईल यासह शासकीय योजनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. घनदाट अरण्य, वृक्ष लागवड तसेच घराजवळ परस बाग व त्याचे फायदे सांगितले. यावर ग्रामस्थांनी गाव जलसमृद्ध करण्याचा एकमुखी निर्धार केला.

गावात पहिल्या टप्प्यात दोन बंधारे बांधणे, देवराईमध्ये वृक्ष लागवड करण्याचे ठरले. यासाठी जलसंपदा विभाग व नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर यांच्याशी चर्चा झाली असून ग्रामस्थांच्या लोकसहभागातून नदीतील गाळ काढण्याचे ठरले. याकामी समीर जानवलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्वरित गाळ काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. येथील गाळ काढल्याने जलसिंचन होऊन जैवविविधता पुनर्जीवित होण्यास मदत होणार आहे.

उपसरपंच अविनाश आंब्रे, ग्रामसेवक किशोर कांबळी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय आंब्रे, योगेश आंब्रे, दर्शन आंब्रे, पोलिस पाटील रिया जाधव, संजय आंब्रे, प्रदीप आंब्रे, मंगेश आंब्रे, जयहिंद आंब्रे, जितेंद्र आंब्रे, दत्ताराम बुरटे, विकास हळदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

गावतळेही गाळाने भरलेले

चिरणी येथील गावतळेही गाळाने भरलेले आहे. त्यातील गाळ काढून तळेही पुनर्जीवित करण्याचे ठरले. गावातील शेती लागवड फार कमी झाली आहे. पाण्याची उपलब्धता झाल्यावर बारमाही शेती करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. स्वतः शेती केली नाही तरी जे करतात त्यांना प्रोत्साहन देत सर्वतोपरी मदत करण्याचे ठरले. घरातील सांडण्याचा वापर करून सेंद्रिय खतातून परस बाग तयार करण्याचे ठरले.

चिरणी गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. देशासाठी या गावाने जसे जवान दिले तसेच किसानही देतील. ग्रामस्थांनी चिरणी गाव जल, वन, कृषी समृद्ध होण्यासाठी स्त्री-पुरुष व तरुणांनी सहभागी होऊन गाव समृद्ध करण्याचा निर्धार केला आहे.

- पांडुरंग जानकर, सरपंच चिरणी

loading image
go to top