रायगडमधील विकासाचा रथ आणखी डौलाने पुढे नेणार : खा. तटकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 June 2019

मागील पराभवाचा वचपा काढत प्रचंड मताधिक्याने निवडून देत संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिली. केंद्रात जरी मोदींचे सरकार असले तरी रायगड मतदारसंघाचा विकासाचा रथ अधिक डौलाने पुढे घेऊन जाणार आहे,'' असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पाली येथे केले.

पाली : ''लोकसभा निवडणुकीत देशात असलेल्या मोदींच्या त्सुनामी लाटेतही रायगड जिल्ह्यातील जनतेने विकासाला प्राधान्य दिले आणि मागील पराभवाचा वचपा काढत प्रचंड मताधिक्याने निवडून देत संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिली. केंद्रात जरी मोदींचे सरकार असले तरी रायगड मतदारसंघाचा विकासाचा रथ अधिक डौलाने पुढे घेऊन जाणार आहे,'' असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पाली येथे केले. महाआघाडीच्या वतीने तटकरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज (सोमवार) मराठा समाज भवनमध्ये करण्यात आले होते.

मला खासदार करण्यात श्रीवर्धनप्रमाणे सुधागड तालुक्याचाही मोलाचा वाटा आहे. लोकसभा मतदारसंघातील पेण, सुधागड, रोहा या विधानसभा मतदारसंघांना विकासाच्या दृष्टीने अधिक झुकते माप देणार असल्याची ग्वाही तटकरे यांनी यावेळी दिली. महाआघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याबद्दल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रातून भरीव विकासनिधी आणून तळागाळातील तसेच आदिवासी पाड्यांवर विकासाचा स्त्रोत पोहचविण्यास कटिबध्द असल्याची ग्वाही तटकरे यांनी दिली. खासदारकीची निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन लढावे, असे आवाहन तटकरे यांनी केले. 

याप्रसंगी आमदार धैर्यशिल पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश खैरे, पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या रा.कॉ. पक्षाच्या अध्यक्षा गीता पालरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा मुख्य संघटक अनुपम कुलकर्णी, पंचायत समिती सदस्या सविता हंबीर, वसंत टाकळेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
विकासकामांना झुकते माप, प्रलंबित प्रश्न सोडविणार

रायगड मतदारसंघातील तरूण सुशिक्षित बेरोजगार, भूमिहीन, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याबरोबरच पाणी, विज, रस्ते व मुलभूत नागरी सेवा-सुविधा देण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावीपणाने काम करणार आहे. पाली-खोपोली महामार्ग रुंदीकरण बाधीत शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. येत्या सहा महिण्यात पालीचा शुध्द पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development is first priority : MP Sunil Tatkare