५६० कोटींच्या आराखड्यातून रत्नागिरी जिल्ह्याचा विकास साधणार; उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Development of Ratnagiri plan of 560 crores Uday Samant politics

५६० कोटींच्या आराखड्यातून रत्नागिरी जिल्ह्याचा विकास साधणार; उदय सामंत

रत्नागिरी : ‘जिल्ह्याच्या पर्यटनाचा ५६० कोटींचा आराखडा तयार केला आहे; पण त्यातील किती प्रकल्प आणू शकलो, याचा आढावा घेईन. पर्यटनाबाबत मंत्रालयात सभा घ्यायची असेल ती घेऊ. जिल्हा पर्यटन नकाशावर आहेच; परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन जिल्हा जागतिक पातळीवर पोहोचण्याकरिता पर्यटनासाठी निधी देण्याची पालकमंत्री म्हणून तयारी आहे. सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया,’ असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय यांच्या माध्यमातून जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून अल्पबचत सभागृहात आयोजित पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. परिषदेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘आंबा, काजू, फणस, मांसाहारी जेवणाची पद्धत सातासमुद्रापार गेली पाहिजे आणि पर्यटक आपल्याकडे आला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे.’

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात सह्याद्री, कातळ आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन होते. खाडी पर्यटन, साहसी खेळ आणि कृषी पर्यटनही सुरू आहे. आपण स्वतः तयारी दाखवली पाहिजे. स्थानिक टीमने पुढाकार घेतला पाहिजे. खाडी पर्यटन व अन्य प्रकारातील पर्यटनासाठी ४०० प्रकारचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहेत. पर्यटकांना सोयी-सुविधा मिळाल्या आणि नैसर्गिकरीत्या पर्यटनाचा आनंद घेता आला तरच ते शाश्वत पर्यटन राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे.’’

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रदीप सिंग, संजय यादवराव, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, महेश सानप, वीरेंद्र सावंत, सॅमसन डिसिल्वा, मंगेश कोयंडे, पर्यटन विभागाचे माळी, युयुत्सु आर्ते, नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.

पर्यटन संस्कृती रुजवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गोव्यात गेल्यावर पर्यटनाचा जो अनुभव येतो, ते पर्यटन. गोव्याप्रमाणे पर्यटन येथेही रुजवायला हवे. पर्यटकांशी आपण कसे वागतो, त्याचा विचार करा. पर्यटनानुकूल परिस्थिती निर्माण केल्याशिवाय पर्यटन वाढणार नाही.

- रमेश कीर

ब्रॅंड रत्नागिरी एमएच ८ नेमका काय आहे, याकरिता मूल्यमापन केले पाहिजे. प्रत्येक तालुक्यासाठी पर्यटन समन्वयक नेमण्याची गरज आहे. सोयी-सुविधा पाहून पर्यटक येतात. महामार्ग पूर्ण झाल्यावर पर्यटकांचा ओघ वाढेल; पण त्यांना सेवा देणारे व पैसे मिळवणारे बाहेरचे असतील, हे ध्यानी घ्या. ५० लाख लोक मुंबईतून रस्त्याने गोव्याला जातात. या महामार्गावरून पर्यटक जाताना त्यांना हॉटेलांतून सुविधा किती देता येतील, याचा विचार करा.

-डॉ. श्रीधर ठाकूर

कोकणच्या पर्यटनवाढीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आंबा, काजू, फणस, मांसाहारी जेवणाची पद्धत सातासमुद्रापार गेली पाहिजे आणि पर्यटक आपल्याकडे आला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित काम करू. पर्यटनातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी. जेवढे प्रयत्न करायला लागतील ते पालकमंत्री म्हणून करेन. मी पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा दौऱ्यात पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेईन.

- उदय सामंत, पालकमंत्री