यंदा देवगड हापूस मर्यादितच 

devgad hapus mango issue
devgad hapus mango issue

देवगड (सिंधुदुर्ग) - बदलते वातावरण, अवकाळी पाऊस, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंबा कलमांना मुबलक मोहोर आला खरा; मात्र आलेल्या मोहोरोत नरफुलांचे प्रमाण अधिक राहिले. आलेल्या मोहोराला भरपूर फलधारणा होण्याच्या आशेने आंबा बागायतदारांनी फवारणी केली; मात्र फलधारणा मर्यादित झाल्याने बागायतदारांची निराशा झाली आहे. त्यामुळे यंदा देवगड हापूसचे उत्पादन मर्यादितच राहण्याची शक्‍यता आहे. 

दरवर्षी आंबा हंगामात बागायतदारांना निसर्गाचा वेगळाच अनुभव गाठीशी येत आहे. गतवर्षी हंगामावर कोरोना आणि पर्यायाने झालेल्या लॉकडाउनचे सावट होते. तरीही आंबा हंगामामध्ये राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये हापूस पोचवण्यात बागायतदार यशस्वी झाला. विक्री व्यवस्थेतील वेगळा अनुभव आंबा बागायतदारांना घेता आला. यातून तुलनेत हंगामच चांगला आणि समाधानकारक गेल्याचे मानले जाते. यंदाही पावसाचे प्रमाण सुरवातीपासून चांगले राहिले; मात्र पाऊस लांबल्याने थंडी लांबली. त्यानंतर थंडी पडायला सुरवात झाली आणि यंदाच्या आंबा हंगामाची चाहूल लागली. आंबा कलमे मोहरू लागली आणि बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. 

आलेला मोहोर टिकवून त्यातून उत्तम फलधारणा होण्यासाठी फवारणी सुरू झाली. थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा कलमे चांगलीच मोहोरली. यातून मुबलक फलधारणा होईल या आशेने फवारणीचा वेग वाढला; मात्र आलेल्या मोहोरात नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने बऱ्याच प्रमाणात मोहोर वाया गेला. यातून अपेक्षित फलधारणा झाली नसल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा आली. यामुळे यंदाचा आंबा हंगाम सुरू झाला तरी त्याला वेग नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बागायतदारांच्या आशा आता अखेरच्या टप्प्यातील मोहोराकडे लागल्या आहेत. 

सुरवातीच्या टप्यात आंबा कलमांना मुबलक मोहोर आला; मात्र त्यात नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने अपेक्षित फलधारणा झाली नाही. आशेने केलेली मेहनत वाया गेली. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. याकडे विमा कंपन्यानी लक्ष द्यावे.
- सदाशिव ओगले, आंबा बागायतदार, दहिबांव 

यंदाच्या आंबा हंगामाची सुरवात खडतर झाली. आलेल्या मोहोराच्या तुलनेत उत्पादन झाले नाही. त्यातच अवकाळीने बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन बागायतदारांना भरपाई देण्याचा विचार करावा.
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठ आंबा बागायतदार, देवगड 

कोकणातून आज वाशी फळबाजारात सुमारे साडेसात हजार आंबा पेटी आली. यामध्ये अलिबागपासून वेंगुर्लेचा समावेश आहे. पाच हजार पेट्या राज्याच्या इतर भागातून आल्या. यामध्ये हापूससह बदामी, तोतापुरीचा समावेश आहे. दोन ते सहा हजार पेटीचा भाव आहे. नरफुलांचे प्रमाण असले तरीही लागवड वाढल्याने आंब्याची आवक बऱ्यापैकी आहे.
- संजय पानसरे, आंबा व्यापारी, वाशी फळबाजार 

संपादन - राहुल पाटील
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com