esakal | Devgad : गणरायाच्या स्वागतासाठी धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

devgad

Devgad : गणरायाच्या स्वागतासाठी धावपळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड : कोरोना, वादळी पाऊस यांसह अनेक अडचणीवर मात करीत यंदा गणरायाच्या स्वागतासाठी भक्तगण आतुर होते. साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे संकेत असले तरीही घरी येणाऱ्या लाडक्या गणरायाच्या स्वागतामध्ये काही कमी राहू नये, यासाठी भक्तांची धावपळ सुरू होती. नैसर्गिक अडचणींबरोबरच कोरोनाचे संकट दूर व्हावे, असे साकडे घालीत शांत वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष टाळत आज सकाळपासूनच तालुक्यातील गणेश मूर्तीशाळांमध्ये भक्तगण मूर्ती नेण्यासाठी येत होते. आज बाजारात विविध माटवीचे साहित्य, फळे, फुले खरेदी सुरू होती. दरम्यान, पाऊस नसल्याने मूर्ती नेताना सोयीचे झाले होते.

कोकणच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. गतवर्षीपासून उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. दूरच्या मंडळींनी दोन दिवसांपासूनच गणेश मूर्ती घरी नेण्यास सुरूवात केल्याचे चित्र होते. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोर धरल्याने भक्तांना बाजारहाट करताना अडचणी जाणवल्या. किनारपट्टीवर वादळसदृशस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. पावसापासून सुरक्षितता म्हणून मूर्ती नेण्यासाठी विशेष काळजी घेतली जाताना दिसत होती.

सकाळी बाजारात माटवीचे साहित्य खरेदी सुरू होती. गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साही वातावरण होते. बाजारात फळे, हार, फुले तसेच मिठाई खरेदी होत होती. कोरोनाचे सावट असले तरीही आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांचा उत्साह होता. आरासाचे साहित्य, इलेक्ट्रीक साहित्य, अगरबत्ती विक्रीची दुकानात खरेदी सुरू होती. ऊन असल्याने बाजारहाट करताना काही अडचणी जाणवल्या नाहीत.

loading image
go to top