रत्नागिरीत भक्तीला नाही तोड ; पुराच्या वेढ्यातही नामगजर

मकरंद पटवर्धन
Thursday, 6 August 2020

 कालपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने दुसर्‍याच दिवशीच काजळी नदीला पूर आला आहे.

रत्नागिरी : काजळी नदीच्या पुराचे पाणी तोणदे गावातील श्री सांब मंदिराच्या कौलांना लागले. मात्र अशा परिस्थितीतही ग्रामस्थांनी अखंड हरिनामचा सप्ताह सुरू ठेवला आहे. मंदिराबाहेर होड्या तैनात केल्या असून पाण्यातच भाविक हरीनामाचा गजर करत आहेत. गाभार्‍यातील पालखी मंदिरात भालावर ठेवली. तसेच विणेकर्‍याने वरची जागा पकडली. भाविक टाळ, मृदंगाचा गजर करत हरीनामचा गजर करत आहेत. 

हेही वाचा - रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे...

तोणदे येथील श्री सांब मंदिरात 3 ऑगस्टपासून हरिनाम सप्ताह सुरू झाला. मात्र काल झालेल्या मुसळधार पावसाने दुसर्‍याच दिवशी काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी गाभार्‍यात, मंदिरात शिरले. सभा मंडपात गुडघाभर पाण्यातही ग्रामस्थांची हरिनाम सप्ताहात भजनसेवा सुरू होती. आज तिसर्‍या दिवशी मंदिराच्या गाभार्‍यासह सर्वत्र पाणीच पाणी झाले. परंतु भाविकांनी अखंड हरिनाम घ्यायचे सोडले नाही.

श्री सांब मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. येथे अनेक वर्षे श्रावणातील सोमवारपासून हरिनाम सप्ताह सुरू होतो. दरवर्षी सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी पुराची स्थिती असते. त्यामुळे सप्ताहाची सांगता मंदिराभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालून केली जाते. पाण्याचे प्रमाण वाढल्याने बहुतांशी वेळा प्रदक्षिणा घालण्यासाठी होडीत पालखी ठेवावी लागते. परंतु यंदा प्रथमच दुसर्‍याच दिवशी महापूर आला आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 

हेही वाचा -  Photo : रत्नागिरीतील मंडणगडची ही नदी पात्राबाहेर...

मंदिराजवळील 6 वाड्यांमधील ग्रामस्थ नामसप्ताहात सहभागी होतात. प्रत्येक वाडीला दिवसातून साधारण तीन तासांची भजनसेवा करण्यास संधी मिळते. मात्र यंदा कोरोनामुळे शासनाचे नियम पाळून, सामाजिक अंतर राखून, मास्क लावून आणि सॅनिटायझरचा वापर करूनच सप्ताह सुरू आहे. त्यामुळे एकावेळी फक्त 5 भाविकांमध्येच नामसप्ताह चालू आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कोकणवासियांची भक्ती आणि उत्साह या निमित्ताने पाहायला मिळाला.

नामसप्ताहात गावची एकी

कोकणात बहुतांशी गावांमध्ये एक दिवस किंवा सात दिवसांच्या हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. गावातल्या मंदिरात अखंड सात दिवस हा उपक्रम चालतो.  प्रत्येक वाडीतील भाविकांना भजनसेवेची संधी मिळते. परंतु यंदा कोरोनामुळे फक्त 5 भाविकांमध्येच नामसप्ताह सुरू आहे.

संपादक - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devotion of god during flood situation in ratnagiri