esakal | Devrukh : चौसोपी वाड्यात ३७५ वर्षांची परंपरा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

devrukh

Devrukh : चौसोपी वाड्यात ३७५ वर्षांची परंपरा कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरूख : कोकणातील गणेशोत्सवाचा आरंभ म्हणून प्रसिद्ध असलेला तसेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला मंगळवारपासून सुरवात झाली. मुसळधार पावसातही आज चौसोपी वाड्यातील आणि श्रीकांत जोशी यांच्या घरातील पारंपरिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या. इ. स. १७०० सालात सांगली जिल्ह्यात असणाऱ्‍या कांदे मांगले या गावाहून देवरूखात आलेल्या भास्कर जोशी बिन बाळ जोशी यांचे थोरले चिरंजिव बाबा जोशी बिन भास्कर जोशी हेच देवरूखमधील श्री सिद्धिविनायक या देवस्थानाचे आद्य संस्थापक आहेत.

बाबा जोशी हे गृहस्थाश्रमी म्हणून देवरूख येथे राहत असताना त्यांना दुर्धर व्याधीने जडले होते. त्यावर त्यांनी देवधामापुरातील शंकराच्या जागृत देवस्थानात व नंतर मोरगावातील मयुरेश्‍वराजवळ कडक उपासना सुरू केली. तेथे त्यांना दृष्टांतानुसार चांदीच्या डब्यात श्री सिद्धिविनायकाची नुकतीच पूजा केलेली मूर्ती सापडली. येथे झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी ती मूर्ती देवरूखात आणली आणि चौसोपी वाड्यात त्याची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व शुद्ध पंचमीला षष्ठी उजाडता संपतो.

कोरोनाचे नियम पाळणार

गेल्या वर्षी कोरोनामुळे हे दोन्ही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे झाले होते. यावर्षीही पोलिसांच्या सूचनेनुसार कोरोनाचे सर्व नियम पाळूनच हे उत्सव साजरे केले जाणार आहेत.

या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाला प्रारंभ

गेली ३७५ वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. सर्वच ठिकाणी गणेशमूर्तीची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना होते. श्रीकांत जोशी आणि चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरवात होते. त्यामुळे या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरवात होते.

पावसातही उत्साह कायम

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने मूर्तींची प्रतिष्ठापना कशी होणार, याबाबत उत्कंठा होती मात्र भर पावसातही दोन्ही गणेशमूर्ती उत्साहात आणि भर पावसात स्थानापन्न झाल्या. आता खऱ्‍या अर्थाने कोकणातील गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

loading image
go to top