देवरूख : मुरादपूर गावात विधवा प्रथा निघाली मोडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

देवरूख : मुरादपूर गावात विधवा प्रथा निघाली मोडीत

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या मुरादपूर गावात आता विधवेचे ना कुंकू पुसले जाणार ना बांगडी फुटली जाणार, हा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आणि विधवा प्रथा बंद करून मुरादपूर गावाने जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केलेल्या ग्रामपंचायतीच्या यादीत स्थान पटकावले आहे. मुरादपूरची ग्रामसभा सोमवारी (ता. २५ ) जिल्हा परिषद मराठी शाळेत पार पडली. या विशेष ग्रामसभेत मुरादपूरवासीयांनी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला.

विधवा महिलांनाही सन्मानाने जगता यावं, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावं, यासाठी गावकऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळींनी हातात हात घालून हा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला. तरुणांचे सहकार्य अपेक्षित होते; परंतु ज्येष्ठ मंडळींनी विधवा प्रथेसारखी अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी घेतलेला पुढाकार ही नव्या बदलाची नांदी असल्याचेही दिसून आले.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरादपूर गावाने अनेक सामाजिक परिवर्तनामध्ये आघाडीवर राहून बदल घडवले आहेत. वारकरी संप्रदायाचं गाव म्हणूनही मुरादपूरची वेगळी ओळख आहे. विधवा प्रथेसारखी अत्यंत वाईट असणारी प्रथा या गावाने मोडीत काढली आहे. सोमवारच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. ग्रामसभेला सरपंच मंगेश बांडागळे, उपसरपंच पर्शराम चोगले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर घुले, शैलेश कुरधोंडकर, रूपाली पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

ही प्रथा बंद करण्यासाठी गणेश बांडागळे, बळीराम बांडागळे, रवींद्र बांडागळे, शिवराम बांडागळे, बबन बांडागळे, संजय बांडागळे, अनिल बांडागळे, नितीन बांडागळे अशा सर्वच ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला. पत्रकार योगेश बांडागळे यांनी या अनिष्ट प्रथेबाबत सविस्तर विवेचन केले. ग्रामपंचायत सदस्य किर्ती चोगले, दीक्षा बांडागळे, स्वरा बांडागळे यांनी ही प्रथा बंद व्हायला हवी, अशी भूमिका मांडली.

कायद्याने समानतेचा अधिकार सर्वांना दिला आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेने सर्वस्वच गमावलेलं असतं. अशातच तिच्या अंगावरील सौभाग्याचे अलंकार काढणे, तिच्या कपाळावरचं कुंकू पुसणे, जोडवी काढणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपण मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले आणि सर्वांनी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- मंगेश बांडागळे, सरपंच, मुरादपूर

पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. इतकेच काय, तर काही गावांमध्ये स्वतःच्या मुलाच्या लग्नातही त्यांना सहभागी होता येत नाही. घराबाहेर पडावं, तर वाईट नजरा पडतात. त्यामुळे ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे.

- दीक्षा बांडागळे, ग्रामपंचायत सदस्या

Web Title: Devrukh Widow Custom In Muradpur Village Broken

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriKokanSakalwidow