शेतकऱ्यांना न विचारताच शेतजमिनीमध्येच केली खोदाई... 

राजेंद्र बाईत
Sunday, 19 July 2020

पाचल येथे ठेकेदाराने शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये खोदाई केली आहे. ही खोदाई करताना इतरत्र दगडही टाकले आहेत.

राजापूर : तालुक्‍यातील पाचल येथे उभारण्यात आलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्पाचा परिसरातील गावांना पाणीपुरवठा व्हावा म्हणून बंदिस्त नलिकेचे काम सुरू आहे. यामध्ये ठेकेदाराने शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये खोदाई केली आहे. ही खोदाई करताना इतरत्र दगडही टाकले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून काही शेतकऱ्यांनी यावर्षी शेतीही केली नाही. ठेकेदाराच्या या बेफीकर कारभारामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी भाजपचे नेते संतोष गांगण यांनी केली आहे. त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडताना वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

पाचल येथे पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा परिसरातील गावांना शेतीसह अन्य कामांसाठी उपयोग व्हावा म्हणून सध्या बंदिस्त नलिकेचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम सध्या करक, तळवडे, ताम्हाणे, रायपाटण, ओशीवळे, बागवे, परटवली आदी गावांमध्ये सुरू आहे. या बंदिस्त नलिकेसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ते व्यवस्थित बुजविलेले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये खोदकाम केलेल्या चरांमधून मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी वाहून जात आहे. खोदकाम करताना आलेले दगड शेतजमिनीत टाकण्यात आले आहेत.

खोदकाम केल्याने त्या ठिकाणी शेती करणे मुश्‍किल झाले आहे. खोदकाम केलेल्या जमिनींमध्ये यावर्षी शेती केलेली नाही. ठेकेदाराच्या बेफिकीरपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गांगण यांनी केली आहे. न्याय मिळून शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला न मिळाल्यास वेळप्रसंगी त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

नियोजन नाहीच... 
अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रातील पाण्याच्या उपयोगाचे कोणतेही नियोजन नाही. बंदिस्त प्लास्टिक पाइप असल्याने जमिनीत पाणी जिरून त्या-त्या परिसरातील विहीरी, ओढे, नदी यांची पाण्याची पातळी सुद्धा वाढू शकत नाही. हा प्रकल्प प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या आर्थिक हितासाठी तर नाही ना, असा सवाल भाजप नेते संतोष गांगण यांनी उपस्थित केला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digging in the farmland without asking the farmers ...