कामे पूर्ण न झाल्यास टंचाई अटळ, पालिका सभेत पडसाद! वाचा सविस्तर...

दीपेश परब
Wednesday, 9 September 2020

याची जबाबादारी जीवन प्राधिकरण विभागाने घेऊन शहरात पाणी पुरवठा करावा, असे आज झालेल्या नगरपरिषदेच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील निशाण तलावाची उंची वाढवण्याचे काम रखडल्यामुळे यंदा वेंगुर्लेवासीयांना उन्हाळ्यात पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. आजच्या पालिका सभेत याबाबत पडसाद उमटले. काम वेळेत पूर्ण न झाल्यास जीवन प्राधिकरण जबाबदार राहिल, असा इशाराही पालिकेच्या बैठकीत देण्यात आला. 

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील धरणाची उंची वाढविण्याचे काम लॉकडाउन व पावसाळ्यामुळे बंद होते; मात्र ऑक्‍टोबरमध्ये काम सुरू होणार या उद्देशाने तसेच धरणाची उंची वाढविण्याच्या कामास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षीप्रमाणे नगरपरिषदेच्यावतीने निशाण तलावातील पाणी साठविण्याचे गेट बंद केलेले नाही; मात्र ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने धरणाची उंची वाढविण्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास शहरात होणाऱ्या पाणी टंचाई अटळ आहे. याची जबाबादारी जीवन प्राधिकरण विभागाने घेऊन शहरात पाणी पुरवठा करावा, असे आज झालेल्या नगरपरिषदेच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. 

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, पूनम जाधव, प्रकाश डिचोलकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप, संदेश निकम, सुमन निकम, प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, सुहास गवंडळकर, तुषार सापळे, कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल आदी उपस्थित होते. 

या चर्चेत नगराध्यक्ष गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे, तुषार सापळे, विधाता सावंत यांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेच्या जुन्या इमारतींची दुरावस्था झालेली असून काही ठिकाणी झाडेही आलेली आहेत. या जुन्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करुन सुस्थितीत करण्याचे नगरसेवक आपटे यांनी सुचविले. यावर या इमारतींची पहाणी करुन प्रशासनाने अहवाल सादर करावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. 

इतर विषय चर्चेत 
गैरसोय टाळण्यासाठी शहरात दोन ठिकाणी स्मशानभूमीत बसविलेली शवदाहिनी कार्यान्वित करण्याची सूचना विधाता सावंत यांनी केली. गाडीअड्डा येथे पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचे प्रकाश डिचोलकर यांनी सांगितले. तेथील जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे, असे मत पाणी विभागाचे सागर चौधरी यांनी मांडले. जागा मिळाल्यास तेथे कुपनलिका खोदू, असे नगराध्यक्षांनी सांगितले. 

निशाणचा गाजला मुद्दा 
निशाण तलाव संदर्भात संबंधित ठेकेदारास ऑक्‍टोबरमध्ये काम पुन्हा सुरू करण्याचे तसेच एप्रिल 2021 पर्यंत काम पूर्णतेचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता नंज्जप्पा यांनी दिली. संबंधित काम वेळेत पूर्ण न झाल्यास पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची राहिल, असे ठरविले. पाणी टंचाईवर विविध उपाययोजना सुचवून नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. 

शाळांबाबत चर्चा 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील ज्या शाळा विलगीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत, त्या शाळांचे विजबिल भरण्यासाठी ठराव घेण्यात आला. प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत 8 प्रकरणे मंजूर असून त्यांना निधी मिळालेला नाही. याबाबत पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. शहरात वीज प्रतिबंधक यंत्रणाही राबविण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली. त्यासाठी योग्य जागा देण्याचे आवाहन केले. 

गॅसचा मुद्दा 
जलवाहिनीद्वारे होणाऱ्या गॅस पुरवठ्याचा लाभ शहरातील नागरिकांना मिळावा, या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅसच्यावतीने नगरपरिषदेच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या गॅस स्टेशनच्या जागेच्या भाड्यात सुट देण्यासंदर्भातील पत्राचा विचार करुन त्यासाठी लागणारे वार्षिक भाड्यात सुट देण्याचे सर्वानुमते ठरविले. अनामत रक्कमे संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीशी चर्चा करुन स्वतः निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion on water problem in Vengurle Municipality