हल्लेखोर बिबट्याची रेस्क्यू टिमला पुन्हा हुलकावणी

राजेश शेळके
Monday, 28 September 2020

बिबट्याचा काही नेम नसल्याने वन विभागाची पथके तेथे तैनात ठेवली आहेत. 

रत्नागिरी - तालुक्यातील पावस पंचक्रोशीतील त्या हल्लेखोर बिबट्याने दुसर्‍यांदा मुंबईच्या पथकाला चकवा दिला आहे. दहा ते बारा दिवस त्याच्यावर पाळत ठेवूनसुद्धा या रेस्क्यू टिमला बिबट्याने हुलकावणी दिली. त्यामुळे बिबट्या त्या भागातून पुढे सरकला असावा, असा प्राथमिक अंदाज टिमच्या तज्ज्ञांनी बांधून दुसर्‍यांदा टिम मुंबईला रिकाम्या हाती परतली. मात्र स्थानिक वन विभाग अजूनही अलर्ट आहे. 

बिबट्याचा काही नेम नसल्याने वन विभागाची पथके तेथे तैनात ठेवली आहेत. तालुक्यातील पावस पंचक्रोशीतील बिबट्याने स्थानिकांना अजूनही घोर लावला आहे. कित्येक महिने या हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना काही यश येत नाही. त्यात त्या वन्य प्राण्याचीही कमालच आहे. या सर्व यंत्रणेला गेली चार ते सहा महिने बिबट्या चकवा देत आहे. दुचाकीस्वारांवर वारंवार हल्ला करून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांकडून गुप्त सर्व्हेही करण्यात आला होता. बिबट्याचे या भागातील वास्तव्य निश्‍चित नसल्याने ट्रॅप कॅमेर्‍यामध्येही तो आढळून आलेला नाही. सापळा लावण्यापासून फ्रॅन्कच्युलाईट करण्याचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा बिबट्याने हल्ले सुरू केल्यानंतर बोरीवलीतील राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले होते. दोन वेळा या टिमने येथे आठ ते दहा दिवस राहून ट्रॅप कॅमेरे, पिंजरा लावूनही बिबट्याचा माग मिळाला नाही. कॅमेर्‍यामध्ये अनेक प्राण्यांच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत. मात्र हल्लेखोर बिबट्याच त्यामध्ये कैद झालेला नाही.

रेस्क्यू टिमने दुसर्‍यांदा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आठ ते दहा दिवसांमध्ये या बिबट्याचे कुठेच वास्तव्य दिसून आले नाही. टिममधील तज्ज्ञांनी तो बिबट्या या भागातून पुढे सरकला असावा असा अंदाज वर्तविला आहे. मात्र बिबट्या काही दिवसाच्या फरकानंतर पुन्हा हल्ले करीत असल्याने येथील वन विभाग सावध आहे. त्यांनी या भागामध्ये आपली गस्त सुरूच ठेवली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृतीही सुरू केली आहे. वन विभागाने आणखी महिनाभर या भागात गस्त सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ वन अधिकार्‍यांनी सांगितले.
 
  संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismiss the attacking leopard rescue team again