सिंधुदुर्गातील अवैध दारू वाहतूक रोखण्याचा जिल्हा पोलिस अधीक्षकांचा शब्द

विनोद दळवी
Tuesday, 6 October 2020

मुंबई सायबर क्राईम येथे उपायुक्त असलेल्या राजेंद्र दाभाडे यांनी नुकताच जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

ओरोस : अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठीचे नियोजन सुरू केल्याची माहिती नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. 

जिल्हा अधीक्षक दीक्षित गेडाम यांची सांगली येथे बदली झाल्यानंतर मुंबई सायबर क्राईम येथे उपायुक्त असलेल्या राजेंद्र दाभाडे यांची शासनाने या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांनी गेल्याच आठवड्यात पदभार स्वीकारला आहे. यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी गडचिरोली, सातारा, रायगड येथे काम केले आहे. मुंबई गुन्हे शाखा व सायबर क्राईम येथे काम केले आहे. आपण मूळ मुंबई येथील असून आता शासनाने सिंधुदुर्गात ही जबाबदारी सोपवली आहे. जिल्ह्याची परिपूर्ण माहिती घेत आहे. जिल्ह्यात सध्या अवैध दारू वाहतूक हा विषय मोठा असून याला चाप लावण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. अशा वाहतुकीचे मार्ग शोधून हे प्रकार थांबवण्यासाठी काम केले जाईल.'' 

ते म्हणाले, "गडचिरोली येथे काम केलेले असल्याने नक्षलवाद्यांना रोखण्याबरोबरच आणखी नक्षली बनू नयेत, यासाठी प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे कळले आहे. त्यामुळे कोरोना काळात काम करताना "कारवाई आणि सामाजिक बांधिलकी' याची सांगड घालून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार आहे. कोरोना नियमावली भंग केल्याने कारवाई करताना माणूसकी दिसली पाहिजे. हा गुन्हा हेल्मेट न वापरण्यासारखा नाही. त्यामुळे आपण मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर त्यांना मास्क देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. `कारवाई व सामाजिक बांधिलकी' अशा स्वरुपात कार्यवाही सुरू झाली आहे.'' 

जिल्हा सुंदर आहे. येथील समुद्र किनारे परदेशापेक्षा अधिक सुंदर आहेत. येथील शांतता पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही संकल्पना असल्यास कळवावे. जिल्ह्यात सर्वांनी मिळून चांगले काम करूया. 
- राजेंद्र दाभाडे, नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Superintendent of Police word to stop illegal liquor traffic in Sindhudurg